
सर्वांच्या लाडक्या गणरायाचा उत्सव दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. मुंबईकर-ठाणेकरांना कोकणातील गणेशोत्सवासाठी गावी जाण्याचे वेध लागले आहेत. या गणेशभक्तांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून २४८ ‘गणपती स्पेशल’ ट्रेन चालवण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाने रविवारी विशेष गाड्यांची यादी आणि वेळापत्रक जाहीर केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि दिवा येथून चिपळूण, रत्नागिरी आणि सावंतवाडीपर्यंत विशेष गाड्या धावणार आहेत.
११ ते २६ सप्टेंबर या कालावधीत गाडी क्र. ०११०३ ही ट्रेन सीएसएमटी ते सावंतवाडी दरम्यान दररोज धावणार आहे, तर गाडी क्र. ०११०४ ही ट्रेन सावंतवाडी ते सीएसएमटी दरम्यान १२ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दररोज धावणार आहे. गाडी क्र. ०११५१ ही ट्रेन सीएसएमटी-सावंतवाडी दरम्यान ११ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दररोज धावेल, तर गाडी क्र. ०११५२ ही ट्रेन सावंतवाडी ते सीएसएमटी दरम्यान ११ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दररोज धावणार आहे. एलटीटी येथून सावंतवाडीसाठी गाडी क्र. ०११७१ ही ट्रेन ११ ते २७ सप्टेंबर दरम्यान दररोज धावणार आहे, तर सावंतवाडीहून एलटीटीला येण्यासाठी गाडी क्र. ०११७२ ही ट्रेन ११ ते २७ सप्टेंबर दरम्यान दररोज धावणार आहे. याव्यतिरिक्त गाडी क्र. ०११२९ ही ट्रेन एलटीटी-सावंतवाडी दरम्यान १५ ते २२ सप्टेंबर या कालावधीत दर मंगळवारी धावेल. गाडी क्र. ०११३० ही ट्रेन सावंतवाडी ते एलटीटी स्थानकादरम्यान १५ ते २२ सप्टेंबर या कालावधीत दर मंगळवारी धावेल. गाडी क्र. ०११३१ ही ट्रेन एलटीटी-सावंतवाडी दरम्यान आठवड्यातून दोनदा दर गुरुवार आणि रविवारी १७, २०, २४ आणि २७ सप्टेंबर दरम्यान धावणार आहे. गाडी क्र. ०११३२ ही ट्रेन सावंतवाडी ते एलटीटी दरम्यान आठवड्यातून दोनदा दर गुरुवार आणि रविवारी १७, २०, २४ आणि २७ सप्टेंबर दरम्यान धावेल. याव्यतिरिक्त रत्नागिरी, चिपळूण, खेडसाठी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

























































