
दिल्लीतील जंतरमंतरवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा दिला आहे. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या प्रसिद्ध शोमधील कलाकारही आंदोलनात उतरले आहेत. अभिनेत्री वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. याचे फोटो वनिता खरात हिने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
वनिता खरात हिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. जय भारत! जय संविधान! काल नीट प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात सहभागी झाले. आपण जिथे असू, तिथून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. कारण आज प्रश्न फक्त एका परीक्षेचा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा, मेहनतीचा आणि आपल्या देशाच्या भविष्याचा आहे, असे वनिता खरातने म्हटले.
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही, तो प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. आपल्या संविधानाने आपल्याला तो अधिकार दिला आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबून भविष्य घडत नाही; त्यांचा आवाज ऐकून राष्ट्र घडतं. आवाज द्या. प्रश्न विचारा. न्यायाची साथ द्या, असेही वनिताने पुढे नमूद केले.
View this post on Instagram
वांगचुक यांनी उपोषण सोडलं, पण…
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 26 दिवसानंतर उपोषण सोडले आहे. दान्ता रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत वांगचुक यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले. वांगचुक यांनी उपोषण सोडले असले तरी कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन मात्र सुरू राहणार आहे. जोपर्यंत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले.



























































