पवईत कंत्राटी बस दुभाजकावर धडकली, बेस्टला अपघातांचे ग्रहण; मुंबईकरांच्या जिवाशी खेळ, 6 प्रवासी जखमी; चालकाचा निष्काळजीपणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील कंत्राटी बसच्या चालकांचा निष्काळजीपणा आणि अपघातांच्या माध्यमातून मुंबईकरांच्या जिवाशी खेळ सुरूच राहिला आहे. मानखुर्द येथील अपघाताची घटना ताजी असतानाच गुरुवारी पवईत कंत्राटी बसला अपघात झाला. चालकाने डाव्या बाजूला मागून येणाऱ्या कारकडे लक्ष ठेवले आणि बस उजव्या बाजूच्या दुभाजकावर जोराने धडकली. अपघातात बसमधील 6 प्रवासी जखमी झाले आहे.

विक्रोळी आगारातील इलेक्ट्रिक बसला गुरुवारी सकाळी 11.05 वाजण्याच्या सुमारास पवई विहार संकुल परिसरात हा अपघात घडला. बस विक्रोळी आगारातून वांद्रे बस स्थानक (पश्चिम) कडे जात होती. बस पवई विहार संकुलजवळ पोहोचली असता चालकाने लक्ष विचलित झाले. चालक मागून डाव्या बाजूने येणाऱ्या कारकडेच लक्ष देत राहिला आणि त्याच्या ताब्यातील बस उजव्या बाजूला असलेल्या दुभाजकाला जोराने आदळली. यात बसमधील सहा प्रवाशांना दुखापत झाली. यावेळी ‘वेट लीज’ आगार व्यवस्थापक किशोर शिंदे यांच्या आदेशावरून बस वाहकाने सर्व जखमी प्रवाशांना वैद्यकीय उपचारांसाठी साकीनाका येथील पॅरामाऊंट हॉस्पिटलमध्ये हलवले.

कठोर कारवाई कधी?

वेटलिज (कंत्राटी) कंपन्यांच्या बसगाड्यांना अपघात होत आहेत. अपघातानंतर निष्काळजीपणा करणाऱ्या चालकांवर दिखावू कारवाई केली जात आहे. मात्र चालकांना योग्य प्रशिक्षण देण्यात आणि गाड्यांच्या देखभालीबाबत बेफिकीर राहणाऱ्या वेटलिज ऑपरेटर कंपन्यांवर कठोर कारवाई कधी करणार, असा सवाल विचारला जात आहे.