बेस्टच्या एसी बसगाड्यांना गळती; प्रवाशांची ‘घुसमट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्टच्या ताफ्यातील अनेक एसी बसगाड्यांना गळती लागल्याने मुंबईकरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. बेस्टच्या एकूण बसगाड्यांपैकी जवळपास निम्म्या गाड्या वातानुकूलित आहेत. त्यामुळे बसमधील गळतीचा त्रास लाखो नियमित प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यातच बसेसमधून क्षमतेपेक्षा जास्त लोक प्रवास करीत असल्यामुळे बसमध्ये पावसाळ्यात प्रवाशांची अधिक ‘घुसमट’ होऊ लागल्याचे चित्र आहे.

मुंबई शहर परिसरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत बेस्टच्या जवळपास २७००हून अधिक बसेस धावतात. यापैकी १२०० ते १५०० बसेस एसी गाड्या आहेत. बेस्टने गेल्या वर्षी मे महिन्यात मोठी भाडेवाढ केल्यानंतर एसी गाड्यांची संख्या वाढवली आणि मुंबईकरांना आरामदायी प्रवास देण्याचा निर्धार केला. पण प्रत्यक्षात एसी गाड्यांची योग्य देखभाल होत नसल्याने एसी गाड्यांचा प्रवास मुंबईकरांसाठी डोकेदुखीचा ठरला आहे. सध्या शहरात पावसाचा जोर वाढला आहे. या पावसात एसी बसगाड्यांना गळती लागल्याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत.

बेस्टच्या ताफ्यातील बहुतांश एसी गाड्यांना गळती लागली आहे. संबंधित गाड्यांच्या देखभालीकडे बेस्ट प्रशासनाचे लक्ष नसल्याने मुंबईकर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. भाडेवाढ करताना आरामदायी प्रवासाच्या मोठ्या घोषणा केलेले बेस्ट प्रशासन आता झोपलेय का, असा सवाल विक्रोळी येथील शरद कदम यांनी केला. दादर येथील प्रसाद भिंगार्डे यांनीदेखील एसी गाड्यांतील गळतीच्या समस्येवर संतप्त प्रतिक्रिया दिली. बसचे तिकीट दुप्पटीने वाढवल्यानंतरही बेस्ट प्रशासन चांगली प्रवाशी सेवा देऊ शकत नाही हे दुर्दैव असल्याची नाराजी साकीनाका येथील अश्विन म्हात्रे यांनी व्यक्त केली.

शिवसेना जाब विचारणार
संपूर्ण बेस्ट प्रशासनाला गळती लागली आहे. गाड्यांच्या देखभालीसाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे मुंबईकरांना अपघात, बसमधील गळती यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बसमधील गळतीबाबत बेस्ट समितीच्या पुढील बैठकीत प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे शिवसेनेचे बेस्ट समिती सदस्य नितीन नांदगावकर म्हणाले.

दरवाजे वारंवार उघडले जात असल्याने समस्या
कमी अंतराच्या बस थांब्यांवर वारंवार एसी बस थांबत असल्याने प्रवाशांसाठी थंडगार प्रवास केवळ घोषणेपुरताच राहिला आहे. एसी बसेसचे दरवाजे वारंवार उघडझाप करीत असल्याने बसमध्ये एसीचा थंडावाच निर्माण होत नाही. एसी गाड्यांचे चालक त्यांच्या केबिनची खिडकी उघडीच ठेवून असतात. तसेच एसी बसची प्रवाशी क्षमता ५०च्या आसपास असते. मात्र गाड्यांची वारंवारता कमी असल्याने बहुतांश मार्गावरील बसमध्ये १०० ते १५० प्रवाशांची बसमध्ये गर्दी असते. त्यामुळे एसी बसचा प्रवास घुसमटीचा ठरला आहे.