
आठ दिवसांपूर्वी झालेल्या धुवांधार पावसाने सर्वच ठिकाणी पुराचा तडाखा बसला. वाड्यातही शेकडो घरांसह हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहे. याबाबत वाडा तहसील दारांना निवेदन दिले आहे.
वाड्यात गेले अनेक दिवस क्षणाचीही विश्रांती न घेता मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे शेती, नदी, नाळे, ओहळ तुडुंब भरून वाहत होते. यात भात शेती, गाव-पाड्यांना जोडणारे अंतर्गत रस्ते, मोऱ्या व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. खरिवली येथील शेतकरी गोविंद झिपरू पाटील या शेतकऱ्याच्या शेतजमिनीतून नाल्याचे पाणी मोरीमधून वाहून न जाता शेतांमध्ये घुसले. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या मोरीची पुनर्बाधणी करून नाल्याच्या बाजूस संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
…तर आंदोलन करू
पंचनामे तत्काळ न केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा जिल्हा संपर्कप्रमुख नीलेश गंधे यांनी दिला आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रकाश केणे, कांतीलाल देशमुख, गोविंद पाटील, तालुकाप्रमुख नीलेश पाटील, सागर भोईर, वाडा शहरप्रमुख प्रमोद घोलप, उपतालुकाप्रमुख सदानंद पाटील, तालुका समन्वयक पुष्कर पाटील, रोहित सोनावणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.





























































