पालघरमध्ये पावसाचा कहर; विरार-डहाणू लोकल सेवा ठप्प, रस्ते, पूल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला, धरणे तुडुंब भरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाने ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा एकदा ‘मुसळधार’ कमबॅक केले आहे. रात्रीपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने पालघर जिल्ह्यात अक्षरशः कहर केला असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. रस्ते, पूल पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर धरणे तुडुंब भरल्याने बळीराजा सुखावला असून पिण्याच्या पाण्याचे टेन्शन दूर झाले आहे. पावसाच्या तडाख्यामुळे आज विरार-डहाणू लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे कामावर प्रवाशांचे अतोनात हाल झाले, बस स्थानकांमध्येही चहूकडे पाणी भरले होते. त्यामुळे एसटीच्या वाहतुकीबरही परिणाम झाला. डहाणू तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस कोसळल्याने चिंचणी, वाणगाव, डहाणूसह विविध ठिकाणी सखल भागात पाणी शिरले. तसेच असंख्य घरे बुडाली. तलासरी व डहाणूत खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. मुसळधार पावसाचा फटका पालघर जिल्ह्यातील वाणगावला सर्वाधिक बसला असून अनेक बैतधा चाळी व इमारती जलमय झाल्या आहेत. शेकडो कुटुंबे घरातच अडकून पडले असून रस्तेदेखील पाण्याखाली गेले आहेत.

डहाणू-गुजरातदरम्यान रुळांवर पाणी

डहाणू ते गुजरातदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. लांबपल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस गाड्या व काही लोकल सेवादेखील रद्द झाल्या. डहाणू रोड विरारदरम्यानची उपनगरीय रेल्वे वाहतूकही ठप्प झाल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली.

नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

पालघर जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा, पिंजाळ व देहर्जा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. डहाणू, तलासरी, जव्हार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धामणी धरण फुल्ल झाली असून आज सकाळी त्याचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे आजूबाजूच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

लघुपाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरली

पालघर जिल्ह्यातील मनोर, देवखोप, खांड, मोहखुर्द, वाघ आणि डोमीहिरा हे लघुपाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहे. माहीम केळवा, रायताळे आणि तुळयाचा पाडा या प्रकल्पातही मुबलक पाणी उपलब्ध झाला आहे.

काळू नदीवरील पूल पाण्यात

टिटवाळा, फळेगाव रस्ता येथील काळू नदीवरील रुंदै पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे फळेगाव, उशीद, भोगलपाडा, दानबाव यांसह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

वसईत कार बुडाली

वसईत पडत असलेल्या तुफान पावसामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. सनसिटी रोड परिसरात आज दुपारी साचलेल्या पाण्यात एक कार अचानक बुडाली. प्रसंगावधान राखत चालकाने वेळीच पळ काढल्याने त्याचा जीव वाचला. कार मात्र पुरात वाहून गेली आहे.

येथील वाहतूक बंद

बोईसर-सरावली, वाणगाव-चिंचणी, तारापूर बायपास, डहाणू तालुक्यातील आशागड, सराबली बस डेपो, इराणी रोड, सागर नाका, कक्राळी ग्रीज, डहाणू-कोसबाड, सायवन-वाघाडी, शील-देहेजें पूल येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

वाड्यात २० घरे कोसळली

वाडा तालुक्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे २० घरे कोसळली आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. २० कुटुंबे ऐन पावसात बेघर झाली असून त्यांची इतरत्र व्यवस्था केली आहे. दरम्यान वादळी वारे आणि तुफानी पाऊस यामुळे चार मोऱ्यादेखील पाण्याखाली गेल्याने त्या गावांचा संपर्क तुटला आहे. वाडा तालुक्यात अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने वीज गायब झाली आहे. शेतीचेही अतोनात नुकसान झाले असून लवकरच पंचनामे करून ग्रामस्थांना भरपाई दिली जाईल, असे आश्वासन तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

रायगड जिल्ह्यातील २२ धरणे भरली

रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून २८ धरणांमध्ये ९२.५९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. २२ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. उर्वरित सहा धरणांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पाणी साठा जमा झाला आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेली उमटे व तीनविरा धरणेही पूर्ण क्षमतेने भरली आहेत.

शाळेचे छप्पर उडाले

चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्याच्या बहाडोली या गावात असलेल्या नूतन विद्यालयाच्या इमारतीचे छप्पर उडाले आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले असून संचालकांसमोर दुरुस्तीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

पाऊस अपडेट

१८ तास बत्ती गुल – पालघर जिल्ह्यातील चिंचणी, वाणगाव, तारापूर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून विजेचे खांब कोसळल्याने १८ ते २० तास बत्ती गुल झाली होती. तांत्रिक दुरुस्तीनंतरच बीजपुरवठा सुरळीत होणार आहे.

महावितरणचे १०८ सबस्टेशन्स ठप्प – तलासरी, डहाणू, बाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा येथील महावितरण विभागाचे १६ सब स्टेशन बंद पडले असून जिल्ह्यात १०८ फिडर ठप्प झाले आहेत. या सर्व ठिकाणी महावितरणच्या कामगारांची टीम दुरुस्तीसाठी तैनात केली आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूककोंडी – मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी ते उंबरगावदरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ट्रॅफिक जाम झाले आहे. पालघर, डहाणू, तलासरी व वसई तालुक्यातील महामार्गावरील बाहतूक पर्यायी मागनि वळवण्यात आली आहे.

कसारा घाटात दरडी कोसळल्या – दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कसारा घाटात ठिकठिकाणी महाकाय दरडी कोसळल्या आहेत. तसेच मातीचा मल बाही वाहून आल्याने नाशिकहून मुंबईकडे जाणारी वाहतूक फक्त एकेरी सुरू ठेवण्यात आली होती. आपत्ती व्यवस्थापन टीमचे दीपक मावरिया, फारुख शेख, राहुल पुरोहित, झुबेर रोख यांनी धाव घेऊन जेसीबीच्या सहाय्याने वाहतूक पूर्ववत केली.

ठाण्यात धावत्या कारवर झाड कोसळले – ठाण्यातील डोकाळी नाका येथे डि-मार्टसमोर आज सकाळी धावत्या कारवर झाड कोसळले. त्यात गाडीचे अतोनात नुकसान झाले असून रामप्रसाद भीम हे चालक बचावले आहेत. महापालिकेच्या आपत्कालीन टीमने धाव घेऊन कारवर पडलेले झाड कापून काढत बाजूला केले.

पाऊस (मि.मी. मध्ये)

अलिबाग – १.२४८, पनवेल १,६१३.५, कर्जत १,४९८.९, खालापूर-१,६९६.३, उरण-१,५४०.५, सुधागड-१,७१६.२, पेण-१. ३३३.६, महाड-१,७४८.४, माणगाव-१,५९९.८, रोहा-१.६०८.१. पोलादपूर-१,६१०.१, मुरूड-१,२०८.४, श्रीवर्धन-१,१२६.८. म्हसळा-१,३४७.२, तळा-१,६९१.५०