
अमेरिकेत माध्यमांचीच कशी मुस्कटदाबी होतेय याची प्रचीती आली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘सीएनएन’, ‘एमएस नाऊ’ (आधीचे एमएसएनबीसी) आणि ‘पॉलिटिको’ या संस्थांच्या पत्रकारांना व्हाईट हाऊसमध्ये प्रवेशबंदी जाहीर केली. विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी ही घोषणा केली, त्यावेळी या संस्थांचे प्रतिनिधी तिथेच उपस्थित राहून वार्तांकन करत होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी रात्री पत्रकार परिषदेत या माध्यम संस्थांवर बंदी घालण्याची अचानक घोषणा केली. हा निर्णय जाहीर करताना आपल्याला अभिमान वाटत असल्याचेही ट्रम्प म्हणाले. ही बंदी तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. या माध्यम संस्थांकडून सातत्याने फेक न्यूज पसरविण्यात येत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ ही वृत्तपत्रेदेखील खोटय़ा बातम्या देतात. मात्र, त्यांची व्हाईट हाऊसमधून हकालपट्टी केलेली नाही, केवळ त्यांचे वृत्तपत्र आत दिसणार नाही, असेही ट्रम्प यांनी जाहीर केले. ट्रम्प यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट लिहून या संस्थांवर आरोप केले. इतर माध्यमांनी आपली भूमिका बदलली नाही तर, त्यांच्यावरही अशीच कारवाई केली जाईल, अशी धमकीदेखील ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून दिली. बंदी घातलेल्या माध्यम संस्थांनी सातत्याने ट्रम्प यांची वक्तव्ये आणि धारणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या संस्थांवर ट्रम्प यांनी वर्ष 2016 पासून सातत्याने पक्षपाती असल्याचा आरोप केला आहे.
जगभरातून टीका
ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेच्या पत्रकारिता क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अमेरिकन संविधानातील प्रथम दुरुस्तीद्वारे प्रसार माध्यमांना स्वातंत्र्य मिळाले आहे. वार्तांकन न आवडल्यास बंदी घालणे बेकायदा आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना मनमानी चालवून कोणत्याही माध्यम संस्थेवर व्हाईट हाऊसमध्ये बंदी घालता येत नाही. यापूर्वी ट्रम्प यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये ‘एपी’ या वृत्तसंस्थेवर बंदी घातली होती. याविरोधात वृत्तसंस्थेने खटला दाखल केला असून हे प्रकरण प्रलंबित आहे.


























































