
मुंबई आयआयटीत बी-टेकच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. साहिलच्या आत्महत्येनंतर विद्यार्थ्यांनी आयआयटी कॅम्पसमध्ये सुरू केलेले आंदोलन आजही सुरू होते. प्रशासनाने हे प्रकरण नीट हाताळले नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तर साहिलच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पवई पोलिसांनी या प्रकरणी अॅट्रॉसिटी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
आयआयटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, साहिल हा परीक्षेत मोबाईल वापरताना आढळला होता. कारवाई होण्याच्या भीतीने तो अस्वस्थ होता. परीक्षेनंतर तो हॉस्टेलवर परतला होता. सायंकाळी त्याच्या खोलीत तो मृतावस्थेत आढळला. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. काही क्षणांतच शेकडो विद्यार्थी कॅम्पसमध्ये जमले आणि त्यांनी निदर्शने सुरू केली. आमच्या एकूणच प्रश्नांबाबत प्रशासन उदासीन असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. साहिलच्या मृत्यूची पारदर्शक चौकशी करा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. आज दुसऱया दिवशी आंदोलन अधिकच तीव्र झाले. साहिलला न्याय द्या, असे म्हणत काही विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये ठिय्या दिला.
आमच्या मुलाचा नाहक बळी घेतला!
साहिलच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केला आहे. माझ्या मुलाचा छळ करण्यात आला. त्याचा नाहक बळी घेण्यात आला. हे कृत्य करणाऱयाला कडक शासन झालेच पाहिजे, आम्हाला न्याय द्या, असे साहिलच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे संबंधितांविरोधात आम्ही आत्महत्येस प्रवृत्त करणे व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असल्याचे पवई पोलिसांनी सांगितले.






























































