
‘देशातील सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवरून विद्यार्थ्यांचा विश्वासच उडाला आहे. विद्यार्थ्यांनी प्रश्नच विचारू नये अशा पद्धतीने ही व्यवस्था काम करत असून फक्त अंधभक्त जन्माला घालत आहे,’ असा हल्ला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज चढवला.
मध्य प्रदेशातील इंदूर येथील आयडीए मैदानावर झालेल्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला 20 ते 25 हजार विद्यार्थी उपस्थित होते. त्यांनी सिस्टम विरुद्ध स्टुडंट्स या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘देशात सध्या अशी व्यवस्था कार्यरत आहे जिने प्रत्येक घटनात्मक संस्था ताब्यात घेतली आहे. सरकार असो, उद्योग असो, शिक्षण असो, आरोग्य असो, क्रीडा असो, मीडिया असो, न्यायव्यवस्था असो, निवडणूक आयोग असो की प्रशासन… प्रत्येक ठिकाणी पैसा आणि प्रभावाला महत्त्व आले आहे. गुणवत्तेला किंमत राहिलेली नाही. या व्यवस्थेचा भ्रष्टाचार, मनमानी आणि अन्यायाच्या विरोधात विद्यार्थ्यांचा आवाज आव्हान बनून उभा ठाकला आहे. त्यामुळे ही व्यवस्था हादरून गेली आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
तो पैसा अदानी–अंबानीच्या खिशात
शिक्षणावरील खर्चाची आकडेवारीच राहुल गांधी यांनी यावेळी दिली. 2014 मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात शिक्षणासाठीच्या अर्थसंकल्पात 4.6 टक्के तरतूद होती, ती आता कमी होऊन 2.6 टक्क्यांवर आली आहे. शिक्षणासाठी जाणारा 7.7 लाख कोटींचा निधी आता अदानी–अंबानी यांच्या खिशात जात आहे, असा आरोप राहुल यांनी केला.
ते म्हणतात, देशाला स्वातंत्र्यच मिळाले नाही!
राहुल गांधी यांनी यावेळी भाजपवर व मोदीभक्तांवर हल्ला चढवला. ‘अंधभक्त म्हणतात की हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळालेच नाही, देशाला विकासाची गरज नाही. मोदी हे विष्णूचा अवतार आहेत. अंधभक्त कधीही हे विचारणार नाहीत की आपल्या शाळा-कॉलेजेसची अवस्था इतकी वाईट का आहे? पायाभूत सुविधा का ढासळल्या आहेत? परीक्षांचे पेपर का फुटत आहेत? हे प्रश्न फक्त एक जागरूक विद्यार्थीच विचारू शकतो,’ असे राहुल गांधी म्हणाले.





























































