
व्यावसायिक केतन अग्रवाल हत्येप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तपास पूर्ण केला असून, तब्बल 5 हजार 500 पानांचे आरोपपत्र वडगाव मावळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केले आहे. केतन याची भावी पत्नी सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हंगे यांच्याविरोधात हे आरोपपत्र दाखल केले आहे.
लोहगडावर ट्रेपिंगसाठी गेल्यानंतर केतन अग्रवाल हा पाय घसरून दरीत पडून त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या पोलीस तपासामध्ये सियाने प्रियकर चेतन याच्या मदतीने केतन याला दरीत ढकलून दिल्याचे समोर आले. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी विविध प्रकारचे भौतिक, तांत्रिक आणि वैद्यकीय पुरावे जमा केले. हे सर्व पुरावे आरोपपत्रासोबत सादर करण्यात आले आहेत.
लोकेशन, कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सअॅप चॅट ठरले महत्त्वाचे
दोषारोपपत्रामध्ये मोबाईलचे लोकेशन, पह्नमधील डेटा, व्हॉट्सअॅपवरील संभाषण, छायाचित्र, कॉल डिटेल रेकॉर्ड, तांत्रिक विश्लेषण अहवाल, तसेच साक्षीदारांचे जबाब यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी 100 पेक्षा अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, त्यापैकी काही साक्षीदारांनी सिया आणि चेतन गुन्ह्याशी संबंधित हालचाली करताना पाहिल्याचे तपासात उघड झाले आहे.


























































