
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात कबड्डी म्हटले की हिंदुस्थानचे नाव अग्रक्रमाने येते. आतापर्यंत झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये हिंदुस्थानने पुरुष-महिला मिळून 11 सुवर्णपदके जिंकली आहेत. हांगझोऊमध्ये 2022मध्ये दोन्ही संघांनी सुवर्णपदक पटकावले होते. त्यामुळे आयची-नागोया येथे या वर्चस्वाला आणखी एक सुवर्णपान जोडण्याचे आव्हान हिंदुस्थानी संघांसमोर आहे.
यंदा पुरुष संघाची धुरा सुनील कुमारकडे सोपविण्यात आली असून पवन सेहरावत उपकर्णधार आहे. हांगझोऊ सुवर्णविजेत्या संघातील पवन, अर्जुन देशवाल आणि अस्लम इनामदार यांच्यासह सुनील कुमार हे अनुभवी चेहरे संघात आहेत. मात्र 12 सदस्यांच्या संघातील आठ खेळाडू आशियाई स्पर्धेत प्रथमच खेळणार असल्याने अनुभवी आणि नवोदितांचा समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे.
अयान लोहचब, देवांक दलाल, आशू मलिक आणि अर्जुन देशवाल यांच्या आक्रमक रेडिंगवरही लक्ष असेल. बचावाची भिंत मजबूत करण्याची जबाबदारी सुनील कुमार, जयदीप दहिया, राहुल सेठपाल आणि सुमित यांच्यावर असेल. पुरुष संघाला प्रशिक्षक म्हणून अनुभवी बलवान सिंह यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
महिला संघाची जबाबदारी पुष्पा राणाकडे आहे. तिच्यासोबत माजी कर्णधार रितू नेगी आणि उपकर्णधार सोनाली शिंगटे यांचा अनुभव संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पूजा काजला, ज्योती ठाकूर, संजू देवी, रितू श्योराण आणि निकिता कुमार यांच्याकडूनही अपेक्षा आहेत. हांगझोऊच्या अंतिम सामन्यात चायनीज तैपेईचा 26-25 असा पराभव करून हिंदुस्थानने सुवर्ण जिंकले होते. यंदा त्या सुवर्णाचे रक्षण करण्याचे लक्ष्य महिला संघासमोर आहे.
महिला संघाच्या गटात बांगलादेश, इराण आणि जपान आहेत. 21 सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध मोहिमेला सुरुवात होणार असून 23 सप्टेंबरला इराण आणि 24 सप्टेंबरला जपानशी सामना होईल. उपांत्य फेरी 25 सप्टेंबरला, तर सुवर्णपदकाची लढत 26 सप्टेंबरला होणार आहे.
- हिंदुस्थानी पुरुष कबड्डी संघ – सुनील कुमार, पवन सेहरावत, अर्जुन देशवाल, आशू मलिक, अयान लोचाब, देवांक दलाल, जयदीप दहिया, राहुल सेठपाल, सुमित सांगवान, गौरव खत्री, अंकित जगलान, अस्लम इनामदार.
- हिंदुस्थानी महिला कबड्डी संघ – पुष्पा राणा, सोनाली शिंगटे, रितू नेगी, संजू देवी, पूजा काजला, रितू श्योराण, ज्योती ठाकूर, पिंकी रॉय, मनिषा कुमारी, भावना ठाकूर, राजराणी, निकिता कुमारी.

























































