हिंदुस्थानची क्रिकेटमध्ये सुवर्णझेप, शफाली, चरणीने उडवला जपानचा धुव्वा; आता 20 सप्टेंबरला बांगलादेशशी उपांत्य लढत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिला क्रिकेट स्पर्धेत हिंदुस्थानने आपली विजयी मोहीम कायम ठेवत जपानचा तब्बल आठ विकेटनी धुव्वा उडविला आणि दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. कोरोगी स्पोर्ट्स पार्कवर झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात हिंदुस्थानी गोलंदाजांनी जपानचा डाव अवघ्या 57 धावांत गुंडाळला. त्यानंतर शफाली वर्माच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानने अवघ्या पाच षटकांत लक्ष्य गाठले.

चरणीच्या भेदक माऱ्याने जपान गारद

कर्णधार हरमनप्रीत काैरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारल्यानंतर हिंदुस्थानी गोलंदाजांनी जपानला सुरुवातीपासूनच दडपणाखाली ठेवले. सातव्या षटकात पहिला धक्का बसल्यानंतर जपानचा डाव सावरलाच नाही. 19.5 षटकांत त्यांचा संपूर्ण संघ 57 धावांत गारद झाला. अयाका कातो स्टॅफोर्डने 47 चेंडूंत 25 धावा करत सर्वाधिक प्रतिकार केला. हारुना इवासाकीने 10 धावा केल्या. हिंदुस्थानकडून श्री चरणीने चार विकेट्स घेत जपानच्या फलंदाजीचा कणा मोडला. शफाली वर्माने दोन, तर श्रेयांका पाटील आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.

आता बांगलादेशशी गाठ

या विजयामुळे हिंदुस्थानने उपांत्य फेरीत प्रवेश केला असून 20 सप्टेंबरला बांगलादेशशी अंतिम फेरीचे तिकीट मिळविण्यासाठी सामना होणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंका आमनेसामने येतील.

श्रीलंकेची मलेशियावर दणदणीत मात

दुसऱया उपांत्यपूर्व सामन्यात श्रीलंकेने मलेशियाचा 86 धावांनी पराभव केला. चमारी अटापट्टूच्या 63 आणि काविशा दिल्हारीच्या नाबाद 44 धावांच्या जोरावर श्रीलंकेने 20 षटकांत चार विकेट्सवर 160 धावा केल्या. प्रत्युत्तरात मलेशियाला सात बाद 74 धावाच करता आल्या.

पाकिस्तानची थायलंडविरुद्ध दमछाक

पाकिस्तानने थायलंडचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. 92 धावांचे लक्ष्य गाठताना पाकिस्तानची चांगलीच दमछाक झाली. सात विकेट गमावल्यानंतर दोन चेंडू राखून पाकिस्तानने विजय मिळविला.

पावसामुळे बांगलादेशला प्रवेश

बांगलादेश आणि चीन यांच्यातील उपांत्यपूर्व सामना पावसामुळे रद्द झाला. चांगल्या सीडिंगच्या आधारावर बांगलादेशला उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला. त्यामुळे आता 20 सप्टेंबरला हिंदुस्थान-बांगलादेश यांच्यात अंतिम फेरीसाठी थेट सामना रंगणार आहे.

शफालीचा स्फोटक फिनिश

58 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानने काही प्रयोग केले. मात्र सलामीला आलेली गुणालन कमालिनी खाते न उघडताच बाद झाली. भारती फुलमालीही सहा धावांवर माघारी परतली. त्यानंतर मात्र शफाली वर्माने आक्रमणाची सूत्रे हाती घेतली. तिने अवघ्या 15 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 40 धावा ठोकत सामना झटपट संपवला. ऋचा घोषने सहा चेंडूंत दोन चौकारांसह नाबाद 12 धावा केल्या. हिंदुस्थानने पाच षटकांत दोन विकेटच्या मोबदल्यात लक्ष्य पार केले.