
आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या पदक मोहिमेला बळ देण्यासाठी शतकापार पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षांत 702.86 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (टीओपीएस) अंतर्गत 97.84 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी दोन्ही योजनांतून झालेला एकूण खर्च सुमारे 800.70 कोटी रुपये आहे
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना उच्च दर्जाचा अनुभव मिळावा यासाठी सर्वाधिक 251.4 कोटी रुपये खर्च करण्यात आले. देशांतर्गत प्रशिक्षणासाठी 118.3 कोटी, तर परदेशी प्रशिक्षक व तज्ञांच्या नियुक्तीसाठी 86.3 कोटी रुपये खर्च झाले. सुमारे 50 परदेशी तज्ञांची मदत घेण्यात आली. हिंदुस्थानी प्रशिक्षकांचे मानधन, राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन, देशात आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेणे आणि प्रशिक्षक विकासासाठीच्या अन्य बाबींवर 117.9 कोटी रुपये खर्च झाले
यंदाच्या पथकातील 310 खेळाडू आशियाई स्पर्धेत पदार्पण करणार असून, त्यापैकी 65 खेळाडू ‘खेलो इंडिया’मधून पुढे आले आहेत. खेळाडूंच्या तयारीत फिजिओ, डॉक्टर आणि क्रीडा विज्ञान तज्ञांचाही समावेश करण्यात आला आहे. 265 सदस्यांच्या सहाय्यक पथकात 56 महिलांचा समावेश आहे. हांगझोऊत 106 पदके जिंकून हिंदुस्थानने विक्रम केला होता. आता त्या कामगिरीला पुढे नेत 100 हून अधिक पदकांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी केलेल्या कोटय़वधींच्या तयारीचा खरा कस नागोयाच्या मैदानावर लागणार आहे.

























































