
कर्जबाजारीपणामुळे एका व्यक्तीने आपल्या 5 वर्षाच्या मुलीची हत्या करून स्वतःही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना गुजरातमध्ये घडली. मुलीची हत्या करून मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला. पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम 103(1) (हत्या) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. आर्थिक विवंचनेतून एका 40 वर्षीय किशोर धनक यांनी टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्येपूर्वी चिट्ठी लिहित किशोरने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आपल्या मृत्यूनंतर मुलीला होणारा त्रास टाळण्यासाठीच आपण तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्याचे त्यांनी चिट्ठीत लिहिले आहे.
किशोर एका बांधकाम साइटवर सुपरवायझर म्हणून काम करत होते. बुधवारी धनक यांची पत्नी माहेरी गेली होती तर1 धनक आपली मुलगी हिमांशीसोबत घरी होते. यावेळी त्यांनी मुलीचा श्वास कोंडून तिची हत्या केली. मग मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून स्वतः गळफास घेत जीवन संपवलं, असे राजुलाच्या पोलीस उपअधीक्षक नयना गोराडिया यांनी सांगितले.
धनक यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी वैयक्तिक कर्ज घेऊन ती रक्कम बांधकाम व्यवसायात गुंतवली होती. त्यांना 7.25 लाख रुपये मिळणे बाकी होते. परंतु व्यावसायिक मित्रांनी त्यांना काहीच दिले नव्हते. यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते. यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
माहेरी गेलेल्या मंजुबेन यांनी धनक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. यामुळे मंजुबेनने बुधवारी संध्याकाळी धनक यांची विचारपूस करण्यासाठी आपल्या भावाला पाठवले. मात्र, कोणीही दरवाजा न उघडल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता धनक पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसले.



























































