
अरुण जेटली स्टेडियमवर अभिषेक शर्मा नावाचे वादळ घोंघावले आणि अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची अक्षरशः भंबेरी उडाली. तिसऱ्या टी-२० सामन्यात अभिषेकने अवघ्या ३० चेंडूंत शतक झळकावत पूर्ण सदस्य देशांच्या फलंदाजांमध्ये सर्वांत वेगवान टी-२० आंतरराष्ट्रीय शतकाचा विक्रम आपल्या नावावर केला. या शतकाच्या जोरावर हिंदुस्थानने ७ बाद २२१ असा धावांचा डोंगर उभारला आणि त्यानंतर नितीश रेड्डी आणि रवी बिश्नोईन अफगाणिस्तानचा संघ ९४ धावांत गुंडाळत १२७ धावांच्या शतकी विजयाचीही नोंद केली. सलग तिसऱ्या विजयासह हिंदुस्थानने टी-२० मालिकाही ३-० ने आपल्या खिशात घातली.
आजचा दिवस अभिषेकचाच होता. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत १६ चेंडूंत अर्धशतक ठोकले त्यानंतर तर त्याने अफगाण गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले. पुढील १४ चेंडूंत आणखी ५० धावा कुटत त्याने शतकाला गवसणी घातली. यापूर्वी हा विक्रम झिम्बाब्वेच्या सिकंदर रझा आणि न्यूझीलंडच्या फिन अॅलन यांच्या नावावर संयुक्तपणे होता. अभिषेकने तो तब्बल तीन चेंडूंनी मागे टाकला. हिंदुस्थानचा यापूर्वीचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. रोहितने २०१७मध्ये श्रीलंकेविरुद्ध ३५ चेंडूंत शतक ठोकले होते. अभिषेकने आता हा विक्रम तब्बल पाच चेंडूंनी मोडीत काढला. शतकानंतरही अभिषेक थांबला नाही.
हिंदुस्थानची शतकी विजयासह हॅट्रिक
पहिल्या सामन्यात ८२. दुसऱ्या सामन्यात ३९ आणि आज १०८ धावा करणाऱ्या अभिषेकने सामनावीरासह मालिकावीराचाही मान मिळवला. त्याने मालिकेत ८५ चेंडूंत २२९ धावा चोपून काढल्या. यात २२ षटकार आणि २० चौकारांचा समावेश होता. म्हणजेच २२९ पैकी २१२ धावा याच होत्या.
दहाव्या षटकात बाद होण्यापूर्वी त्याने ३४ चेंडूंत १०८ धावा फटकावल्या. त्याच्या तुफानी खेळीत ९ चौकार आणि तब्बल ११ षटकार होते. म्हणजेच १०२ धावा चौकार-षटकारांच्याच होत्या. हासुद्धा एक विक्रमच आहे. अभिषेकचे हे आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील तिसरे शतक ठरले. हिंदुस्थानकडून रोहित शर्मा (५) आणि सूर्यकुमार यादव (४) यांच्यानंतर सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता तिसऱ्या क्रमांकावर आहे.
अभिषेक बाद झाला तेव्हा हिंदुस्थान १ बाद १४२ या स्थितीत होता. म्हणजे धावसंख्येतील ७६ टक्क्यांहून अधिक धावा एकट्या अभिषेकच्या होत्या. त्याचा साथीदार संजू सॅमसनने २५ चेंडूंत ३४ धावा केल्या. दरम्यान, टी-२० क्रिकेटमधील सर्व देशांचा विचार केला तर एस्टोनियाच्या साहिल चौहानचा २७ चेंडूंत शतकाचा विक्रम अजूनही अबाधित आहे. अभिषेक बाद झाल्यानंतर हिंदुस्थानच्या डावाला नजर लागली. कुणीही वेगात धावा करू शकला नाही. त्यामुळे पहिल्या दहा षटकांत १४२ धावा केल्यानंतर पुढील १० षटकांत ७९ धावांच काढता आल्या आणि हिंदुस्थानने आपले सहा फलंदाज गमावले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तानने सहाव्या षटकांतच हार मानली. त्यांचे आघाडीचे चार फलंदाज ४७ धावांवर बाद झाले आणि त्यानंतर उर्वरित फलंदाज बाद व्हायला फार वेळ लागला नाही. नितीश रेड्डी आणि रवी बिश्नोई यांनी ३-३ विकेट घेत अफगाणिस्तानला शंभरीतच गुंडाळले आणि संघाचा शंभर नंबरी विजयही साजरा केला.


























































