13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, किशोरवयीन मुलांसाठी नियम कडक; युरोपियन युनियनचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युरोपियन युनियनमध्ये अल्पवयीन आणि किशोरवयीन मुलांचे मानसिक आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले आहे. 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी आणि किशोरवयीन मुलांना मर्यादित प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार युरोपियन युनियन किड्स ॲक्ट (EU Kids Act) अंतर्गत प्रस्ताव मांडण्यात आला आहे, अशी घोषणा युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी केली.

मुले आतापर्यंतच्या सर्वात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, परंतु हे तंत्रज्ञान त्यांचे हित, मानसिक विकास आणि सुरक्षितता लक्षात घेऊन तयार केलेले नाही, असे वॉन डेर लेयन म्हणाल्या. गुरुवारी आयोजित एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

वय आणि टप्प्यानुसार नवीन नियमांची रचना केली जाईल. मुलांच्या वयानुसार वेगवेगळ्या स्तरावर निर्बंध आणि सुरक्षा उपाययोजना लागू केल्या जातील. यात तीन वयोगटांचा समावेश आहे.

13 वर्षांखालील मुले : 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी असेल.

13 ते 15 वर्षे वयोगट : या वयोगटातील मुलांना केवळ मिनी अकाउंट्स वापरण्याची परवानगी असेल. ही खाती पालकांद्वारे तयार केली जातील आणि त्यांच्या देखरेखीखाली चालवली जातील. तसेच दिवसाला एक तासाची वेळ मर्यादा असेल.

15 ते 18 वर्षे वयोगट : किशोरवयीन मुलांना वैयक्तिक खाती वापरण्याची परवानगी असेल. मात्र, या वयोगटातील मुलांसाठी, प्लॅटफॉर्म्सना सुरक्षित रचना (safe design) लागू करणे अनिवार्य असेल.

सोशल मीडिया, व्हिडिओ-शेअरिंग प्लॅटफॉर्म्स, ऑनलाइन गेम्स, एआय (AI) आणि चॅटबॉट्स यांनाही नवीन सुरक्षा नियमांचे पालन करावे लागेल, असे टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.