
गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजेच्या आवाजावर पोलिसांकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. उत्सवाच्या काळात ५० डेसिबलची मर्यादा राखणे बंधनकारक असताना मात्र ठाण्यात मात्र दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देताना डीजेचा दणदणाट झाला. विसर्जन मिरवणुकीत ९५ ते १०० डेसिबल अशी सर्वाधिक ध्वनी पातळी नोंदवण्यात आली असून राम मारुती रोडवर अक्षरशः कानठळ्या बसल्या. त्यामुळे नियमांची ऐसी की तैसी करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर कारवाईचे ‘विघ्न’ येण्याची शक्यता आहे.
मंगळवारी ठाणे शहरात निघालेल्या दीड दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषणात पातळीत वाढ झाल्याचे समोर आले आहे. विसर्जन मिरवणुकांच्या पाहणी अहवालानुसार शहरातील विविध भागांत ध्वनी पातळी ८० ते ९५ डेसिबलच्या सुमारास नोंदवण्यात आली, तर राम मारुती येथील चौकात ९५ ते १०० डेसिबल ध्वनी पातळीची नोंद करण्यात आली. यंदाच्या मिरवणुकांमध्ये डीजे, डॉल्बी, बँजो, ढोल-ताशे आदी एकत्रित वापरामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण झाल्याचे समोर आले.
इशाऱ्यानंतरही कानाडोळा
ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि ठाणे पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांना डीजेचा वापर न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नियमांचे उल्लंघन केल्यास डीजे सिस्टीम जप्त करणे, दंड आकारणे आणि थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्यानंतरही कानाडोळा करत ठाण्यात आवाजाने शंभरी पार केल्याचे दिसून आले.
या भागात मर्यादा ओलांडली
राम मारुती रोड येथे ९० डेसिबल, नौपाडा पोलीस ठाण्याजवळ ९० डेसिबल, राम मारुती रोडवरील आयसीआयसीआय बँकेजवळ ९० ते ९५ डेसिबल, शिवाईनगर ९० ते ९५ डेसिबल आणि पाचपाखाडी ९० ते ९५ डेसिबल ध्वनी पातळी नोंदवण्यात आली. राम मारुती रोडवर रात्री ११ नंतर ध्वनी पातळीत अचानक वाढ होत आवाजाची मर्यादा ९५ ते १०० डेसिबलपर्यंत पोहोचली































































