विरार, नालासोपाऱ्यात तलावाचे गेट तोडून भक्तांनी केले विसर्जन; महापालिकेची तारांबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वसई-विरार शहरात दीड दिवसाच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी प्रशासन आणि गणेशभक्तांमध्ये वाद झाला. नालासोपारा पूर्वेतील मोरेगाव तलाव तसेच विरार पूर्वेकडील कोपरी तलावाचे गेट तोडून भक्तांनी गणरायाचे विसर्जन केले. त्यामुळे महापालिका प्रशासनाची तारांबळ उडाली. जलप्रदूषणाचे कारण पुढे करून प्रशासनाने हे दोन्ही तलाव विसर्जनासाठी बंद केले होते.

विरारच्या कोपरी परिसरातील तलावात अनेक वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थांकडून पारंपारिक पद्धतीने गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. मात्र यंदा प्रशासनाने पर्यावरणाच्या दृष्टीने तलावात विसर्जनास प्रतिबंध केला. त्यामुळे ग्रामस्थ आणि गणेशभक्तांमध्ये नाराजी पसरली. गणेश विसर्जनासाठी तलावाचा मार्ग बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निर्णयाला विरोध केला. यावेळी परिस्थिती चिघळत गेल्याने ग्रामस्थांनी बंद करण्यात आलेले तलावाचे गेट तोडून गणेशमूर्तीचे विसर्जन केले. त्यामुळे या भागात काही काळ तणाव निर्माण झाला.