कनकाडीतील ‘जल जीवन’ योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात संगमेश्वर पंचायत समितीसमोर ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील मौजे कनकाडी ग्रामपंचायत हद्दीतील ‘जल जीवन मिशन’ योजनेत झालेल्या कथित अपहार, अनियमितता आणि कागदोपत्री बिले मंजूर करण्याच्या गैरव्यवहाराविरोधात आज, १७ सप्टेंबर रोजी संगमेश्वर पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामस्थांनी आमरण बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. तक्रारदार विकास बारकू गुरव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले असून, वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने आणि चालढकल होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

कनकाडी येथील जल जीवन मिशन योजनेतील कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी, ग्रामपंचायत स्तरावर विशेष सभा आयोजित करावी आणि या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून १५ दिवसांत लेखी अहवाल द्यावा, अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने लावून धरण्यात आली होती. संबंधित ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग देवरूख कार्यालयाने पाहणी व सभेचे आश्वासन पत्राद्वारे दिले होते; मात्र निश्चित तारीख न ठरवता प्रत्यक्ष कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमधील असंतोष शिगेला पोहोचला. प्रशासनाच्या या दिरंगाई आणि आश्वासनांच्या भंगाविरोधात पूर्वसूचना दिल्याप्रमाणे आजपासून पंचायत समिती कार्यालयासमोर हे तीव्र आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

या आंदोलनात विकास गुरव यांच्यासह प्रशांत गुरव, संदीप गोताड, प्रकाश नेवरेकर, मनोहर गुरव, शांताराम गुरव, गणपत गोताड, प्रकाश गुरव, प्रविण गुरव, राजाराम गोताड, संतोष डांगल, शिवाजी गराटे, करण गराटे, रोहित चाचे, प्रविण गराटे, धोंडीराम गुरव, संदेश घडशी, महेश गुरव यांच्यासह कनकाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही आणि कामांची निष्पक्ष चौकशी सुरू केली जात नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला असून, आता यावर पंचायत समिती व संबंधित प्रशासन काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.