
दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यात शेतकर्यांच्या घरातील दिवे विझत असताना मुख्यमंत्री पंतप्रधानाच्या वाढदिवसाला दिवे लावत असतील तर त्याने शेतकर्यांच्या घरात या दिव्यांच्या प्रकाश पडणार आहे का? असा जळजळीत सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. दुष्काळाचे पंचनामे करण्यासाठी पंचाग पाहून मुहूर्त काढण्यापेक्षा कर्नाटक सरकारप्रमाणे महाराष्ट्रात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना मदत करा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.
आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘मराठवाड्याचा विकास- तुमसे ना हो पायेगा’ हे शिवसेनेचे धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर प्रहार केला. सध्या मराठवाड्यासह महाराष्ट्रात दुष्काळात होरपळत आहे. तुझे – माझे करण्यापेक्षा आजचे कोण निस्तारणार हे महत्वाचे आहे. नैसर्गिक आपत्ती आली तर काय तयारी असायला पाहिजे होती? उपायोजना कशा पद्धतीने राबवणार? हे पाहणे गरजेचे आहे. दुष्काळाबद्दल नुसतीच चिंता करून काय उपयोग? दुष्काळाशी लढण्यासाठी तुम्ही तयारी का नाही केली, असा सवाल करून उद्धव ठाकरे म्हणाले, कर्नाटक राज्याने दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना मदतही सुरु केली. तुम्ही काय केले? आज शहरात ९ दिवसांआड पाणी मिळतेय, शेतकर्यांचेही प्राण कंठाशी आले आहेत, आणि मुख्यमंत्री पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करतायेत. इकडे शेतकर्यांच्या घरातील दिवे विझत असताना पंतप्रधानांच्या वाढदिवसाला दिवे लावून शेतकर्यांच्या घरात प्रकाश पडणार आहे काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकांना सत्य दिसतेय. महाराष्ट्राला व देशाला चांगले दिवस यावेत म्हणून २०१४ ते २०१९ मध्ये भाजपसोबत शिवसेना सत्तेत होती. त्यावेळी देखील शिवसेनेने जाहीरपणे आपला विरोध मांडला. त्यानंतर राज्यात माझ्या नेतृत्वाखाली राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. अडीच वर्षाच्या काळात पहिल्याच नागपूर येथील हिवाळी अधिवेशात कुणीही न मागता दोन लाख रुपयापर्यंत शेतकर्यांची कर्जमाफी केली होती. त्यासोबतच दहा रुपयात शिवभोजन सुरू केले. या दोन घोषणांची तातडीने अंमलबजावणी करण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेनेने ‘मराठवाडा विकास- तुमसे ना हो पायेगा’ हे १७ दिवस जनआंदोलन केले. यावर मुख्यमंत्र्यांनी टिका केल्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, हा नाकर्तेपणा कुणाचा आहे? दुष्काळाचे पंचनामे ५ ऑक्टोबरनंतरच का? मराठवाड्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. चारा टंचाई निर्माण झाली आहे. सरकार जनावरांसाठी चारा छावण्या कधी सुरू करणार? अच्छे दिन कधी येणार? शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट कधी करणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या माध्यमातून इतिहासातील सर्वात मोठे पॅकेज दिल्याचे सरकार सांगतेस. मात्र प्रत्यक्षात या माफीचा किती शेतकऱ्यांना फायदा झाला? ही कर्जमुक्ती आहे की कर्जमाफी? नक्की कोणाचा फायदा होणार? बँकांचा फायदा होऊ न देता कशी कर्जमुक्ती देणार, किती शेतकरी कर्जमुक्त झाले असे सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
नवरात्रात शिवसेना महाराष्ट्र पिंजून काढणार
दुष्काळी स्थितीबाबत ५ ऑक्टोनंतर पंचनामे करण्याचा मुहूर्त फडणवीस सरकारने काढला आहे. पण हे पंचनामे कसे होतात? त्यासाठी कसे निकष लावल्या गेले याची इत्यंभूत माहिती घेण्यासाठी आणि शेतकर्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी नवरात्रोत्सवात शिवसेनेचे आमदार, खासदार महाराष्ट्र पिंजून काढतील असेही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
जाती-पातीच्या भिंती पाडा, एकत्र या!
जाती-जातींमध्ये भांडणे लावून हे सरकार आपले स्वार्थ साधत आहे पण या सरकारचा मुकाबला करायचा तर जाती पातीच्या भिंती पाडून सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. महाराष्ट्राची एकजुट दाखवा. ज्या पद्धतीने जेन-झींनी ताकद दाखवली. त्याप्रमाणे जातीच्या भिंती पाडून एकत्र येऊन सरकारला आपली एकी दाखवा असे ते म्हणाले.




























































