सरकारने अमेरिकेपुढे शरणागती पत्करली, UPI एमडीआर शुल्कावरून काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) युपीआय (UPI) व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) लागू केल्यावरून देशात राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला असून, सरकारने अमेरिकेच्या दबावापुढे संपूर्णपणे शरणागती पत्करल्याचा गंभीर आरोप केला आहे.

के. सी. वेणुगोपाल यांनी सरकारचे स्पष्टीकरण फेटाळून लावत ते पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे. पूर्वी डिजिटल व्यवहारांच्या फायद्यांचा मोठा गवगवा करणारे सरकार आता सामान्य जनतेला कॅश व्यवहार करण्यास भाग पाडत आहे, असेही ते म्हणाले. हा थेट सर्वसामान्य जनतेचा मुद्दा असून काँग्रेस या जनविरोधी कारभाराविरोधात अधिक तीव्र लढा देईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, अमेरिकन कार्ड कंपन्यांच्या फायद्यासाठी आणि परदेशी दबावापोटी सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून सतत केला जात आहे.