सिडनीला जाणाऱ्या मलेशिया एअरलाइन्सच्या विमानात हिंदुस्थानी प्रवाशाचा मृत्यू, हवेतच दम्याचा अटॅक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्वालालंपूरहून सिडनी प्रवासादरम्यान मलेशिया एअरलाइन्सच्या विमानात 58 वर्षीय हिंदुस्थानी प्रवाशाचा मृत्यू झाला. प्रवासादरम्यान संबंधित व्यक्तीला अचानक दम्याचा अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाला. मयत प्रवाशाची ओळख अद्याप पटलेली नाही.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मलेशियन एअरलाईन्स विमान बुधवारी क्वालालंपूरहून सिडनीला चालले होते. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 5.50 च्या सुमारास सिडनी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांना विमानात एक प्रवासी आजारी असल्याची माहिती देण्यात आली. विमान सिडनी विमानतळावर उतरताच सदर प्रवाशाला वैद्यकीय मदतीसाठी नेण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

विमान कर्मचारी आणि सहप्रवाशांनी त्या व्यक्तीला प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर त्यांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मलेशिया एअरलाइन्स आणि सिडनी विमानतळ प्रशासनाने या प्रकरणावर अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.