
कोकणातील पारंपरिक रानभाज्यांचे महत्त्व, त्यातील पौष्टिकता आणि त्यापासून तयार करता येणाऱ्या विविध खाद्यपदार्थांची माहिती नागरिकांना व्हावी, या उद्देशाने रामराजे महाविद्यालयात ‘रानमाया २०२६’ या रानभाज्यांपासून तयार केलेल्या नावीन्यपूर्ण पदार्थांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातर्फे गेल्या अकरा वर्षांपासून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.
प्रदर्शनासाठी ‘नाणीचो वाडो’ कृषी पर्यटन, कुडाळचे संस्थापक स्मितेश तांबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी दापोली तालुक्याचे कृषी अधिकारी हेमंत ठोंबरे, रामराजे महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. संदीप राजपुरे, जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव सचिन गायकवाड, पंचायत समिती सदस्य निलेश शेठ, पंचायत समितीच्या उपसभापती नम्रता तोडणकर, संस्थेच्या अध्यक्षा स्मिताली राजपुरे, प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण, डॉ. दीपक हर्डीकर, धनंजय यादव, विजय दळवी, मीना रेड्डी, जानकी बेलोसे, रुचिता नलावडे, रेखा जेगरकल, विश्वेश्वरी दरेकर, शेफ मनोज कुमार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शनात भारंगी, टाकळा, कुरडू, कारटोली, चिचाडी, मायाळू, रताळ्याची पाने, प्याव, दार, कुड्याच्या शेंगा, शतावरी, थरबरा यांसह ४५ हून अधिक रानभाज्यांपासून विविध खाद्यपदार्थ तयार करण्यात आले होते. पारंपरिक रानभाज्यांना आधुनिक पाककलेची जोड देत विद्यार्थ्यांनी तयार केलेले पदार्थ हे प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरले.
जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी डॉ. कुणाल मेहता, रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. संदीप बागायतकर, रोटरी क्लब व लायन्स क्लबचे सदस्य, जेसी सदस्य, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विविध रानभाज्यांपासून तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला.
कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि स्थानिक जैवविविधतेचे जतन करण्याच्या दृष्टीने ‘रानमाया २०२६’ प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. गेल्या अकरा वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविल्याबद्दल नागरिकांनी रामराजे महाविद्यालयाचे कौतुक केले.
























































