
अनेक लोकांचा असा समज आहे की दिवसाला अडीच ते तीन लिटर पाणी प्यायल्याने शरीर पूर्णपणे हायड्रेट राहाते. मात्र, शरीराला पूर्ण हायड्रेशन मिळण्यासाठी केवळ पाणी पुरेसे नसून इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखणे देखील अत्यंत आवश्यक असते. हायड्रेशनमुळे उन्हाळ्यात जास्त आलेला घाम, उलट्या, जुलाब किंवा दिवसभराच्या कामानंतर जेव्हा शरीरातून पाण्यासोबत महत्त्वाचे खनिजे बाहेर पडतात, तेव्हा फक्त पाणी शरीराची गरज भागवू शकत नाही.
इलेक्ट्रोलाइट्स हे असे खनिजे असतात जे शरीरातील द्रवांमध्ये मिसळून विद्युत ऊर्जा तयार करतात. यामध्ये प्रामुख्याने सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि क्लोराईड यांचा समावेश होतो. हे घटक शरीरात पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासोबतच स्नायूंचे कार्य सुरळीत ठेवणे आणि हृदयाचे ठोके नियमित ठेवण्यास मदत करतात. सोडियम रक्ताचे प्रमाण आणि पाणी संतुलित ठेवते, तर पोटॅशियम नसा आणि स्नायूंच्या कार्यासाठी गरजेचे असते. कॅल्शियम स्नायूंच्या आकुंचनासाठी तर मॅग्नेशियम ऊर्जा निर्मितीसाठी मदत करते.
सामान्य दिवसांत संतुलित आहार आणि पुरेशा द्रवपदार्थांतून शरीराला आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स मिळतात. मात्र, अतिप्रमाणात घाम येणे, तीव्र व्यायाम, ताप, उलट्या-जुलाब किंवा काही औषधांच्या वापरामुळे शरीरातील सोडियम व इतर इलेक्ट्रोलाइट्स कमी होऊ शकतात. इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडल्यास डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे, स्नायूंमध्ये गोळे येणे किंवा एकाग्रतेत अडथळा येणे अशी लक्षणे दिसून येतात. तसेच उलट्या-जुलाबासोबत तीव्र चक्कर, लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा चक्कर येऊन पडण्यासारखा त्रास होतो. अशावेळी, शरीरातील पाणी कमी झाले असल्यास योग्य प्रमाणात तयार केलेले ओआरएस (ORS) अत्यंत उपयुक्त ठरते.
- किडनी किंवा हृदयाचे विकार असलेल्या रुग्णांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय इलेक्ट्रोलाइट सप्लिमेंट्स किंवा एनर्जी ड्रिंक्स पिणे टाळावे.
- वारंवार थकवा किंवा डिहायड्रेशनचा त्रास होत असल्यास परस्पर पावडर किंवा ड्रिंक्स घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या.



























































