
वनडे संघातून बाहेर पडलेल्या ऋषभ पंतकडे आता शेष हिंदुस्थानच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे. १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान श्रीनगरच्या शेर-ए-कश्मीर स्टेडियमवर होणाऱ्या इराणी करंडकामध्ये पंतच्या नेतृत्वाखालील शेष हिंदुस्थान संघाची लढत रणजी विजेत्या जम्मू-कश्मीरशी होणार आहे. या संघाचा सरफराज खान उपकर्णधार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत स्थान न मिळाल्यानंतर पंतसाठी हा सामना स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी ठरणार आहे. आगामी न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी त्याला सामन्याचा सरावही मिळणार आहे. आकाश दीपच्या पुनरागमनावर मात्र फिटनेस टेस्टची टांगती तलवार आहे. मुकेश कुमार, मुकेश चौधरी, आर्यन पांडे यांच्या वेगवान माऱ्यासह अनुकूल रॉय, मानव सुथार आणि सारांश जैन यांच्यावर फिरकीची जबाबदारी असेल. स्मरण रविचंद्रन आणि आयुष दोसजा फलंदाजीला बळ देतील.

























































