उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे ‘समान काम-वेतन’ द्या ! दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘समान काम समान वेतन’ आणि उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी वाढवा या मागण्यांसाठी मुंबईतील दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत हे आंदोलन करण्यात आले.

मुंबईमध्ये या आंदोलनाला कर्मचाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय, मुंबई आणि त्यांच्या अधिपत्याखालील न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालये, शहर दिवाणी व सत्र न्यायालय, लघुवाद न्यायालय, कुटुंब न्यायालय आणि औद्योगिक न्यायालय येथील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. कर्मचाऱ्यांनी आंदोलनादरम्यान आपले नियमित न्यायालयीन कामकाज कोणताही अडथळा निर्माण न करता पार पाडले.

शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा !
प्रमुख मागण्यांसाठी महासंघाने यापूर्वीच शासनाला आंदोलनाची नोटीस दिली आहे. हे आंदोलन शासनाविरोधातील संघर्ष निर्माण करण्यासाठी नसून न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, या उद्देशाने शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाने स्पष्ट केले आहे.