सातारा गॅझेट लागू करा! जरांगेंचा सरकारला तीन महिन्यांचा अल्टीमेटम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 18 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सोडताना मनोज जरांगे यांनी सातारा गॅझेट लागू करण्यासाठी राज्य सरकारला तीन महिन्यांचा अल्टीमेटम दिला आहे. ‘नवीन जीआर काढून गॅझेटियरची अंमलबजावणी करावी. 58 लाख नोंदी कमी होणार नाहीत याची खात्री सरकारने द्यावी,’ असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

उपोषण सोडल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘ही लढाई थांबणार नाही. आंदोलन सुरूच राहील. मराठा समाजाशी खुन्नस ठेवणे योग्य नाही. कोणत्याही मंत्र्याने आमच्यावर टीका केली तर गप्प बसणार नाही. माझे सरकारसोबत वाद नाहीत किंवा वैर नाही पण समोरून वार आला तर आपण काय करणार, असा प्रश्न त्यांनी केला. यावेळी मराठा आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाप्पाचे दर्शन घेऊन परत फिरा!

जरांगे यांनी 18 सप्टेंबरपासून मुंबईला जाण्याची घोषणा केल्यानंतर मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत पोहोचले होते. त्यांनाही जरांगे यांनी संदेश दिला. या सर्व मराठा बांधवांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन माघारी यावे, असे जरांगेंनी सांगितले.

उपचारासाठी रुग्णालयात दाखल

जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरातील गॅलेक्सी सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू राहतील, अशी माहिती डॉ. विनोद चावरे यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना दिली. 20 दिवसांच्या उपोषणामुळे अशक्तपणा, शुगर, बीपी कमी झाला होता. त्यांच्या किडनीला सूज असून उपचार सुरू आहेत.