विमान उड्डाणानंतरची अनिवार्य घोषणा न केल्याने, एअर इंडिया एक्सप्रेसच्या 8 क्रू मेंबर्सचे निलंबन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमानाचे उड्डाण झाल्यानंतर निर्धारित वेळेत अनिवार्य घोषणा न केल्याने, एअर इंडिया एक्सप्रेसने आठ क्रू सदस्यांचे निलंबन केले आहे. तीन महिन्यांसाठी हे निलंबन करण्यात आले आहे. दुबईवरून अमृतसरला आलेल्या विमानाचे लॅंडिंग झाल्यानंतर ही घटना घडली होती. 2 आॅगस्टला झालेल्या या घटनेमध्ये, दुबईहून अमृतसरला विमान उतरल्यानंतर क्रू सदस्यांना दोन तासांच्या आत अनिवार्य पोस्ट-फ्लाइट डिक्लेरेशन सादर करणे आवश्यक होते. मात्र, या क्रू सदस्यांकडून निर्धारित वेळेपेक्षा ३५ मिनिटांचा विलंब झाला. त्यांनी विमान उतरल्यानंतर दोन तास ३५ मिनिटांनी ही घोषणा सादर केली.

टाइम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एअरलाइनच्या अनिवार्य नियमांनुसार संबंधित सर्व क्रू सदस्यांची सायकोअॅक्टिव्ह पदार्थ आणि अल्कोहोल चाचणी करण्यात आली. या सर्व चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) देण्यात आली. त्यानंतर एअर इंडिया एक्सप्रेसने संबंधित आठ क्रू सदस्यांवर तीन महिन्यांच्या निलंबनाची कारवाई केली.

DGCAच्या नियमांनुसार, हिंदुस्थानातून आंतरराष्ट्रीय उड्डाणे करणाऱ्या विमानांच्या क्रू सदस्यांसाठी हिंदुस्थानात विमान उतरल्यानंतर निर्धारित कालावधीत पोस्ट-फ्लाइट अल्कोहोल चाचणी पूर्ण करणे अनिवार्य आहे. या नियमांचे पालन करताना कोणत्याही वैयक्तिक कारणामुळे झालेला विलंब ग्राह्य धरला जात नाही.