
हिंदुस्थानच्या भूमीवर आशियाई अजिंक्यपद हॉकी करंडक स्पर्धा खेळण्याची वेळ येताच पाकिस्तानची पुन्हा एकदा पळापळ सुरू झाली आहे. हिंदुस्थानविरुद्धचे सामने तटस्थ ठिकाणी हलवावेत, अशी मागणी पाकिस्तान हॉकी महासंघाने (पीएचएफ) एशियाई हॉकी महासंघाकडे (एएचएफ) केली आहे. दोन्ही देशातील संवेदनशील द्विपक्षीय संबंध आणि सुरक्षेची परिस्थिती यांचा दाखला देत पाकिस्तानने हा खटाटोप सुरू केला आहे.
पीएचएफचे अध्यक्ष मोहिउद्दीन अहमद वानी यांनी एएचएफकडे संपूर्ण स्पर्धाच तटस्थ ठिकाणी हलवावी किंवा पाकिस्तानचे सर्व सामने हिंदुस्थानबाहेर खेळवावेत, अशी मागणी केली आहे. खेळाडू आणि अधिकाऱ्यांना सुरक्षित आणि अनुकूल वातावरण मिळावे, हा या मागणीमागील उद्देश असल्याचे वानी यांनी सांगितले.
हिंदुस्थानातच रंगणार हॉकी संग्राम
आशियाई अजिंक्यपद हॉकी करंडक स्पर्धा २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान पंजाबमध्ये होणार आहे. जालंधर आणि मोहाली येथे या स्पर्धेचे सामने रंगणार आहेत. हिंदुस्थानसह पाकिस्तान, मलेशिया, चीन, जपान आणि दक्षिण कोरिया या सहा संघांचा स्पर्धेत सहभाग आहे. २७ ऑक्टोबरपासून २ नोव्हेंबरपर्यंत जालंधर येथे उद्घाटन सोहळ्यासह साखळी फेरीतील सर्व सामने होतील. त्यानंतर मोहाली येथे ४ नोव्हेंबरला उपांत्य सामने, तर ५ नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे.
हिंदुस्थानशी राजकीय तणावाचे कारण पुढे करत पाकिस्तानने यापूर्वी हिंदुस्थानात झालेल्या आशिया कपमध्येही सहभागी होण्यास नकार दिला होता. आता आशियाई अजिंक्यपद हॉकी करंडक स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाकिस्तानने तटस्थ मैदानाचा मुद्दा पुढे केला आहे.


























































