दिल्ली विद्यापीठातील निवडणुकीत हिंसाचार; उच्च न्यायालयाची नाराजी, निकाल रोखण्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकी दरम्यान होत असलेल्या हिंसाचाराबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने हिंसाचार प्रकरणी विद्यापीठ प्रशासन, दिल्ली पोलीस आणि राज्य सरकारला नोटीस बजावून शुक्रवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. हिंसाचार रोखण्याबाबत समाधानकारक पावले न उचलल्यास मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यावर बंदी घालू, असा इशारा न्यायालयाने दिला आहे.

दिल्ली विद्यापीठातील निवडणुकी दरम्यान बुधवारी रात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये संघर्ष झाला. ‘एबीव्हीपी’ आणि ‘एनएसयूआय’च्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. एका शिक्षकालाही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाची गंभीर दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीचा प्रचार बुधवारी संपला असून १८ सप्टेंबर रोजी मतदान आणि १९ सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे.