राहुल गांधींपासून मेलोनींपर्यंत… पंतप्रधान मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंच्च्याहत्तरी पूर्ण करून 76व्या वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यापासून ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन व इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही त्यांचे अभिष्टचिंतन केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय, जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवर पोस्ट करत मोदींना शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडमधील तारेतारकांनीही मोदींचे अभिष्टचिंतन केले. अभिनेते खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही मोदींचे अभिष्टचिंतन केले.

जॉर्जिया मेलोनी यांनी ‘माय फ्रेंड नरेंद्र मोदी’ म्हणत मोदींना शुभेच्छा दिल्या. ‘मोदींना उत्तम आरोग्य आणि यश लाभो. इटली व हिंदुस्थानचे संबंध आणि मैत्री अधिक दृढ होवो’, अशा सदिच्छा त्यांनी एक्सद्वारे व्यक्त केल्या आहेत.

केजरीवालांच्या खोचक शुभेच्छा

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी एका वेबसाइटवरील बातमी शेअर करत मोदींना खोचक शुभेच्छा दिल्या. ‘दिल्लीच्या निवडणुकीआधी 40 टक्के मतदार वाढवले आणि एसआयआरमध्ये त्यांची नावे वगळली…’ ही बातमी शेअर करत केजरीवाल म्हणाले, ‘आणि अशा प्रकारे मोठय़ा प्रमाणावर मतघोटाळा करून मोदींनी दिल्ली जिंकली. लोकशाहीची हत्या केल्याबद्दल मोदींचे अभिनंदन आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा!’