
श्री रामजन्मभूमी मंदिरातील पूजाव्यवस्था अधिक शिस्तबद्ध आणि पारंपरिक करण्यासाठी धार्मिक समितीने पुजाऱ्यांसाठी नवी नियमावली आणि ड्रेसकोड लागू केला आहे. या नियमावलीनुसार पुजाऱ्यांना नवा ड्रेसकोड, क्लीन शेव्ह आणि शेंडी ठेवणे बंधनकारक असणार आहे. रामानंदी परंपरेचे तंतोतंत पालन करण्याचे नियम राम मंदिर व्यवस्थापनाकडून लागू करण्यात आले आहेत.
पुजाऱ्यांना गर्भगृहात किंवा पूजेच्या वेळी पिवळ्या रंगाचे रेशमी/सुती धोती आणि उपरणे परिधान करणे अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर केशभूषा आणि दाढीबाबत कडक नियमांचे पालन करावे लागणार आहेत. पुजाऱ्यांना एकतर पारंपरिक ‘पंचकेश’ नियमांचे पालन करावे लागेल किंवा पूर्णपणे क्लीन शेव्ह करावी लागेल. अर्धवट वाढवलेली दाढी किंवा केस ठेवण्यास सक्त मनाई आहे. कपाळावर रामानंदी टिळा लावणे आणि गळ्यात तुळशीची माळ धारण करावी लागणार आहे. तसेच गर्भगृहात मोबाईल फोन घेऊन जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.






























































