Mumbai accident news – कोस्टल रोडवर अनियंत्रित BMW कारचा भीषण अपघात; 3 तरुणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी भल्या पहाटे एक भीषण अपघात घडला. मरीन ड्राईव्हकडून हाजी अलीच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव काळ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू कारचा लाला कॉलेजसमोर, लोटस जेट्टीजवळ अपघात झाला. अतिवेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

कोस्टल रोड नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी घडला. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना नायर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच तिघांची प्राणज्योत मालवल्याची माहिती नायर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

मृतांपैकी दोघांची ओळख पटली आहे. शनाय गज्जल (Shanay Gajjal, वय – 21), धैर्य सेठ (Dhirya Seth, वय – 17) अशी त्यांची नावे असून या अपघातात एका 25 वर्षीय तरुणाचाही मृत्यू झाला असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. एक 20 वर्षीय तरुण या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या नायर रुग्णालयातील ट्रॉमा वार्डमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

कारचा वेग प्रचंड असल्याने अपघात इतका भीषण होता की वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, मृत आणि जखमी तरुणाची अधिक ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक पोलीस करत आहेत.