
मुंबईतील शिवाजी पार्क मैदानातील उद्यान गणेश मंदिराने पावसाच्या माऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी मान्सून शेड बांधली आहे. मात्र ही शेड अनधिकृत ठरवत त्यावर कारवाई करण्याची नोटीस मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाने मंदिराला बजावली आहे. ऐन गणेशोत्सवात नोटीस बजावण्यात आल्याने गणेशभक्तांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
2011 मध्ये लोकवर्गणीतून या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले होते. या मंदिरासाठी राजस्थानमधील जयपूरमधील संगमरवरी दगड आणला आहे. पावसाच्या माऱ्यापासून संगमरवरी दगडाचे संरक्षण करण्यासाठी आणि पावसात गणेश भक्तांना त्रास होऊ नये म्हणून गेल्या तीस वर्षांपासून मंदिरावर मान्सून शेड बांधण्यात येते. त्यासाठी मुंबई महापालिकेकडे रीतसर अर्ज केला जातो. 1 जून ते 30 सप्टेंबर या काळासाठी मान्सून शेडसाठी परवानगी मागितली जाते. त्याचे शुल्कही भरले जाते. येत्या 30 तारखेला ही मान्सून शेड काढण्यात येणार होती. पण त्यापूर्वीच पालिकेने नोटीस बजावली आहे.
मंदिर पूर्णपणे नियमात
यापूर्वीही 2011 मध्ये पालिकेने मंदिराला नोटीस बजावली होती. तेव्हा मंदिर सुमारे एक हजार चौरस फूट जागेवर होते. त्यानंतर मंदिराचे बांधकाम साडेसातशे चौरस फुटांचे करण्यात आले. आता मंदिर पूर्णपणे पालिकेच्या नियमानुसार बांधले आहे.
सचिन तेंडुलकरचे भावनिक नाते
प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे या मंदिराशी भावनिक नाते आहे. अजूनही सचिन पहाटेच्या सुमारास येथे दर्शनासाठी येतो. उमेदीच्या दिवसात आचरेकर सरांच्या नेटमध्ये क्रिकेटचा सराव केल्यावर तो नियमितपणे दर्शनाला व शेजारील मंदिराच्या पाणपोईत पाणी प्यायला येत असे. त्याशिवाय देशभरातील दिग्गज राजकीय नेते आणि सेलिब्रेटी यांचेदेखील हे श्रद्धास्थान आहे, असे मंदिराचे व्यवस्थापक संजय आईर यांनी सांगितले.


























































