मंथन – भरतनाट्यमच्या ‘सीमापार’ पर्वाचा अस्त!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राहुल गोखले
[email protected]

पाकिस्तानात भरतनाट्यम या भारतीय नृत्याची कलासाधना अखंड सुरू ठेवत तिथे हजारो शिष्य घडवणाऱया भरतनाट्यम नृत्याच्या साधक इंदू मिठा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील, जिद्दी आणि निष्ठावंत कलासाधकाला आपण गमावले आहे.

कलेला भौगोलिक सीमांचे किंवा धार्मिक बंधन नसते याचे इंदू मिठा या मूर्तिमंत उदाहरण होत्या. फाळणीपूर्व भारतात लाहोरमध्ये जन्मलेल्या इंदू फाळणीच्या वेळी इतर लक्षावधी निर्वासितांप्रमाणे भारतात आल्या. मात्र विवाहानंतर त्यांनी पाकिस्तानात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानात जाताना त्या भरतनाट्यम या भारतीय नृत्याचा दीप आपल्यासोबत घेऊन गेल्या आणि तो त्यांनी तेथे अखंडपणे प्रज्वलित ठेवला. प्रतिकूल वातावरण, त्यातही विशेषत झिया उल हक यांच्या काळात झालेली कला व कलाकारांची गळचेपी यांसारख्या खडतर परिस्थितीला तोंड देत त्यांनी आपली कलासाधना सुरूच ठेवली आणि हजारो शिष्यांना भरतनाट्यमचे धडे दिले. अलीकडेच डब्लिन येथे वयाच्या 97 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील, जिद्दी आणि निष्ठावंत कलासाधक काळाच्या पडद्याआड गेल्या असेच म्हटले पाहिजे.

इंदू मिठा यांचे पणजोबा ब्राह्मण कुटुंबातील. कलकत्त्यातील एका मंदिरात ते पुजारी होते. इंदू यांच्या आजोबांनी मात्र ख्रिस्ती धर्म स्वीकारून लाहोरमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. इंदू यांचे वडील ज्ञानेश्चंद्र चॅटर्जी हे लाहोरमधील शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य आणि ख्यातनाम शिक्षणतज्ञ व तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. लाहोरमध्ये जन्मलेल्या इंदू यांचे आयुष्य कदाचित तेथेच सुरळीतपणे गेले असते; परंतु 1947च्या फाळणीने सर्व चित्रच पालटून गेले. लक्षावधी निर्वासितांप्रमाणे चॅटर्जी कुटुंबही भारतात आले. इंदू यांचे शिक्षण दिल्लीत झाले आणि त्यांनी दिल्ली विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेच; पण त्याबरोबरच रुक्मिणीदेवी अरुंडेल यांच्या शिष्या ललिता शास्त्राr यांच्याकडे भरतनाट्यमचे धडे गिरवले. दरम्यान, एका घरगुती समारंभात त्यांची भेट ब्रिटिश-भारतीय लष्करात कार्यरत असणारे व मुंबईतील मेमन कुटुंबातील अबूबकर उस्मान मिठा यांच्याशी झाली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर दोन्ही कुटुंबांचा विरोध डावलून त्यांनी विवाह केला आणि सर्वांना धक्का देत पुन्हा पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला.

अबूबकर यांच्या बदल्यांमुळे कराची, लाहोर आणि इस्लामाबाद येथे त्यांचे वास्तव्य राहिले. अबूबकर यांनी पाकिस्तानी लष्करात मेजर जनरल पदापर्यंत मजल मारली, तर इंदू यांनी त्या जेथे गेल्या तेथे भरतनाट्यमची ज्योत तेवती ठेवली. लाहोरमध्ये त्यांनी झोरा सेहगल यांच्याकडेही नृत्याचे धडे गिरविले होते. विचित्र विरोधाभास असा की, इंदू मिठा भारतातून पाकिस्तानमध्ये गेल्या, तर झोरा सेहगल पाकिस्तानातून लंडनमधील वास्तव्यानंतर का होईना, पण कालांतराने भारतात आल्या. पाकिस्तानात भरतनाट्यम नृत्य प्रकाराचा प्रसार करण्याचा ध्यास इंदू मिठा यांनी घेतला. त्या देशात सुरुवातीच्या काळात पुराणमतवादी दृष्टिकोन तुलनेने कमी होता व त्यामुळे हा भारतीय परंपरेतील नृत्य प्रकार असला तरी तो तेथील लोकांपर्यंत पोहोचवता येईल अशी त्यांना अपेक्षा होती. अर्थात, नृत्याच्या जाहीर सादरीकरणाला नेहमीच परवानगी असायची असे नाही. त्यामुळे ही कला पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित करण्यासाठी त्यांनी लाहोरमधील ‘लाहोर ग्रामर स्कूल’पासून ते स्वतच्या ‘मजमून-ए-शौक’ या नृत्य अकादमीपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना नृत्याचे धडे दिले. त्यास प्रतिसादही मिळाला. मात्र, जनरल झिया-उल-हक यांच्या कार्यकाळात कडक इस्लामीकरणाचे धोरण राबवले गेल्यामुळे सार्वजनिक नृत्य सादरीकरणावर बंदी आली.

पाकिस्तानातील अग्रगण्य कथक नर्तकी नाहिद सिद्दिकी यांच्या कलेला इस्लामविरोधी ठरवण्यात आले. दडपशाहीमुळे त्यांनी 1979 मध्ये अखेरीस ब्रिटनमध्ये आश्रय घेतला. दुसरीकडे, मूळचे भारतातील असलेले गुरू घनश्याम आणि त्यांची पत्नी नीलिमा यांनी 1950च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान सुहरावर्दी यांच्या आमंत्रणावरून कराची येथे स्थलांतर केले होते आणि जवळपास तीन दशके त्यांचे कला केंद्र पाकिस्तानमधील शास्त्राrय नृत्य समुदायाचे केंद्रस्थान राहिले, परंतु सातत्याने होणारा छळ आणि कठोर दडपशाहीमुळे गुरू घनश्याम यांना 1983 मध्ये आपली अकादमी बंद करून अमेरिकेत स्थायिक व्हावे लागले. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान न सोडता भरतनाट्यम कलेचा प्रसार करत राहण्याची इंदू मिठा यांची जिद्द अनोखी ठरते.
अर्थात, इंदू मिठा यांना अनेक तडजोडी कराव्या लागल्या. ‘कृष्णा’ऐवजी केवळ ‘माखनचोर’ किंवा ‘नटराज’ऐवजी ‘नृत्यदेवता’ असे उल्लेख करावे लागणे हे त्याचेच उदाहरण. पाकिस्तानात भरतनाट्यम कला जिवंत ठेवण्यासाठी आपण शंभर तडजोडी केल्या आहेत, असे इंदू मिठा यांनी स्पष्ट केले होते. तथापि त्या तडजोडींना प्रयोगशीलता म्हणणे जास्त सयुक्तिक. कारण त्यामागील हेतू उदात्त होता. भरतनाट्यम हा प्रामुख्याने दक्षिण भारतीय संस्कृतीशी जोडलेला नृत्य प्रकार, परंतु पाकिस्तानातील सांस्कृतिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी मिठा यांनी भरतनाट्यमच्या बंदिशी आणि गाणी उर्दू भाषेत रचली आणि कलेला एका देशाच्या किंवा धर्माच्या चौकटीत अडकू दिले नाही. फैज अहमद फैज यांच्या उर्दू शायरीवर त्यांनी भरतनाट्यमचे नृत्याविष्कार बसवले तसेच नृत्यामध्ये स्त्राrवादी विचार मांडले. गेल्या सहा दशकांत पाकिस्तानमध्ये दोन हजार महिला त्यांच्याकडे भरतनाट्यम शिकल्या. कन्या तेहरिमा यांच्यासह हा शिष्यवर्ग इंदू मिठा यांचा वारसा पुढे नेतील अशी आशा करावयास हरकत नाही.

इंदू मिठा यांच्या भगिनी उमा आनंद यांनी भारतातच राहणे पसंत केले आणि प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांचे बंधू चेतन आनंद यांच्याशी विवाह केला. ‘टॅक्सी ड्रायव्हर’सारख्या चित्रपटांचे लेखन उमा आनंद यांनी केले. तसेच त्या संगीत नाटक अकादमीच्या ‘संगीत नाटक’ या मासिकाच्या दीर्घकाळ संपादिकाही होत्या. अनेक पुस्तकेही त्यांच्या नावावर जमा आहेत. एका फाळणीने या दोन भगिनींना दोन भिन्न देशांत विभागले. मात्र, दोन्ही बहिणींनी आपापल्या क्षेत्रांत ठसा उमटविला हे त्यांच्यातील साम्य! उमा आनंद यांचे 2009 मध्ये निधन झाले आणि आता इंदू मिठाही कालवश झाल्या. इंदू मिठा यांचे निधन म्हणजे भरतनाट्यम हे शास्त्राrय नृत्य पाकिस्तानात जाऊन रुजवणाऱया व तेथे तो वारसा जोपासणाऱया एका पर्वाचा अस्त आहे!
(लेखक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत.)