
>> वर्णिका काकडे
आपल्या जंगलात अजूनही किती अद्भुत आणि कमी परिचित जीवसृष्टी दडलेली आहे. तळकोकणातल्या घनदाट जंगलात आढळला दुर्मिळ ‘वनमानव’ सिंधुदुर्गात स्लेंडर लोरिस हा अत्यंत दुर्मिळ प्राणी वन्यप्रेमींना आढळून आला आहे. रात्रीच्या वेळी हा प्राणी हुबेहूब माणसासारखा दिसत असल्यामुळे त्याला वनमानव म्हटलं जातं.
सिंधुदुर्गच्या तिलारी जंगलात दुर्मीळ स्लेंडर लॉरिस म्हणजेच स्थानिक भाषेत ओळखला जाणारा ‘वनमानव’ पुन्हा कॅमेऱयात दिसला आहे. मोठे डोळे, शांत हालचाली आणि रात्रीचं जगणं त्यामुळे हा छोटासा जीव पाहणं म्हणजे अनेकांसाठी खूपच दुर्मीळ अनुभव मानला जातो. हा निशाचर प्राणी वानरकुलातील असून दाट जंगलात राहतो, म्हणूनच त्याचं नजरेस पडणं निसर्गप्रेमींसाठी खास बातमी ठरली आहे.
सिंधुदुर्गात आंबोली, केसरी, फणसवडे, तळकट, झोळंबे या गावांच्या आसपासच्या जंगलात आणि तिलारीच्या घनदाट जंगलात काही जणांना आत्तापर्यंत हा प्राणी दिसला आहे. हा प्राणी माकडाच्या प्रजातीतलाच एक अत्यंत दुर्मिळ प्राणी आहे. श्रीलंका आणि भारत या दोन देशात याचं मूळ आहे. वन्यजीव अधिनियम 1972 नुसार या प्राण्याचा ‘शेड्यूल वन ‘ म्हणजे अधिसूची क्रमांक एक मध्ये समावेश करण्यात आलाय. मात्र या प्राण्याच्या आंतरराष्ट्रीय तस्करीची शक्यता असल्यामुळे याचं अचूक स्थान अत्यंत गुप्त ठेवलं गेलं आहे.
दक्षिण भारतात तामिळनाडूत आणि अति पावसाच्या पश्चिम घाटातल्या घनदाट जंगलात या प्राण्याचं अस्तित्व आढळलं आहे. अत्यंत हळु हालचाल करणारा हा प्राणी हुबेहूब एखाद्यापश्चिम घाटा लहान मुलासारखा दिसत असल्यामुळे त्याला वनमानव म्हटलं गेलय. स्लेंडर लोरिस अर्थात वनमानव जंगलात आढळणे म्हणजे हे जंगल अद्यापही जैवविविधतेने अत्यंत समृध्द असल्याचं उदाहरण आहे.
या अत्यंत दुर्मिळ प्राण्याचा प्रत्येक अवयव हा अत्यंत औषधी असल्याचा प्राणी तस्करांचा समज आहे. तसंच जादूटोणा, करणी, जारण मारण यासाठी तांत्रिक मांत्रिकांकडून या प्राण्याला मोठी मागणी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्लेंडर लोरिसला आंतरराष्ट्रीय तस्करीचा धोका आहे. सिंधुदुर्गातल्या ज्या तालुक्यात हा स्लेंडर लोरिस आढळलाय तो दोडामार्ग तालुका हा भारत सरकारने नेमलेल्या कस्तुरीरंगन समितिने इकोसेन्सिटीव्ह झोन मधून वगळलाय. समृध्द जैवविधता, मुबलक पाणी आणि घनदाट जंगल असल्यामुळेच या भागात अनेक जंगली प्राण्यांप्रमाणेच वाघही आहेत. मात्र तिलारीच्या एकूण जंगलसंपदेपैकी फक्त 28 चौरस किलोमीटरचं जंगल वनविभागाच्या मालकीच आहे आणि उरलेलं म्हणजे जवळपास 95 टक्के जंगल खाजगी मालकीचं आहे.


























































