जागर- चीनचा AI हवामान अंदाजाचा नवा जुगार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> भावेश ब्राह्मणकर
[email protected]

नेपाळमधील हाहाकारानंतर जगभर हवामान अंदाज आणि नैसर्गिक आपत्तींची चर्चा होत आहे. त्यातच चीनने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Aघ्) आधारे हवामान वर्तवण्याच्या क्षेत्रात घेतलेली मोठी झेप संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहे.

‘उद्या पाऊस पडेल का?’ हा प्रश्न माणसाला शतकानुशतके पडत आला आहे. कधी आकाशातील ढग, वाऱयाची दिशा, पक्ष्यांची हालचाल यावरून त्याचे उत्तर शोधले गेले. पुढे हवामान केंद्रे, रडार, उपग्रह आणि संगणकीय मॉडेल्स आली. आता या प्रश्नाच्या उत्तरात कृत्रिम बुद्धिमत्तेची भर पडली आहे. फरक एवढाच की, या वेळी बदल फक्त हवामानाचा अंदाज घेण्याच्या पद्धतीत होत नाही, हवामान समजून घेण्याच्या मानवी क्षमतेचीच पुनर्रचना होत आहे.

चीनने या बदलाची दिशा ओळखून मोठी झेप घेतली आहे. शांघाय एआय लॅबोरेटरीचे फेंगवू (Fengwu), हुआवेचे पेंगू (Pangu) आणि फुदान विद्यापीठाचे फुक्सी (Fuxi) यासारखी AI आधारित हवामान मॉडेल्स विकसित होत आहेत. पारंपरिक हवामान अंदाज पद्धतींना पर्याय म्हणून नव्हे, तर त्यांना पूरक ठरतील अशा या प्रणालींची क्षमता आता प्रत्यक्ष हवामान घटनांमध्ये तपासली जात आहे. काही चाचण्यांमध्ये फेंगवूने गुगलच्या ग्राफकास्टपेक्षा अनेक हवामान चलांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. डॉल्फिन चक्रीवादळाच्या मार्गाचा अंदाजही त्याने वादळ जमिनीवर धडकण्याच्या काही दिवस आधी उल्लेखनीय अचूकतेने दिल्याचे वृत्त आहे. म्हणजेच हवामान बदलाच्या युगात कोणाकडे अधिक चांगला अंदाज बांधण्याची क्षमता आहे, याची स्पर्धा सुरू झाल्याचे हे संकेत आहेत.

पारंपरिक हवामान अंदाजात वातावरणातील तापमान, दाब, आर्द्रता, वाऱयाचा वेग, समुद्राचे तापमान यांसारख्या असंख्य घटकांचा विचार केला जातो. भौतिकशास्त्रावर आधारित गुंतागुंतीची समीकरणे संगणकांच्या मदतीने सोडविली जातात. या प्रक्रियेला मोठी संगणकीय शक्ती आणि वेळ लागतो. AI या प्रक्रियेकडे वेगळ्या पद्धतीने पाहते. प्रचंड प्रमाणातील जुन्या हवामान डेटामधून तो नमुने आणि परस्परसंबंध शिकतो. त्यावरून भविष्यातील परिस्थितीचा अंदाज तयार करतो. त्यामुळे गणना करण्याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. आपत्ती व्यवस्थापनासाठी हा वेग निर्णायक आहे.

चक्रीवादळाचा मार्ग काही तास आधी समजण्यापेक्षा काही दिवस आधी समजला, तर नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यापासून मच्छीमारांना समुद्रात जाण्यापासून रोखण्यापर्यंत अनेक निर्णय वेळेत घेता येतात. पूर, अतिवृष्टी, उष्णतेची लाट किंवा वादळ याबाबत मिळालेला प्रत्येक अतिरिक्त तास प्रशासनासाठी आणि नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरतो. म्हणून AI चे सर्वात मोठे सामर्थ्य ‘भविष्य सांगण्यात’ नसून भविष्यासाठी तयारी करण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध करून देण्यात आहे, पण याच ठिकाणी एक गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. AI हवामान आपत्ती रोखणार नाही. ती वादळाची दिशा बदलणार नाही, पाऊस थांबवणार नाही किंवा समुद्राचे तापमान कमी करणार नाही. तिची भूमिका अधिक अचूक पूर्वसूचना देण्याची आहे आणि बदलत्या हवामानाच्या काळात ती भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे.

AI च्या प्रगतीने प्रभावित होणे स्वाभाविक असले तरी तिच्यावर अंधविश्वास ठेवणे धोकादायक आहे. चक्रीवादळ कुठे धडकेल, पावसाचे क्षेत्र कुठे असेल किंवा तापमानातील बदल कसा होईल, याबाबत AI मॉडेल्स प्रभावी ठरू शकतात. मात्र वादळाची नेमकी तीव्रता, अत्यंत टोकाच्या घटनांचे स्वरूप आणि दीर्घकालीन हवामान बदल याबाबत अजूनही मर्यादा आहेत. याचे कारण AI च्या सामर्थ्यातच दडलेले आहे, पण हवामान बदलामुळे भविष्यातील हवामान स्वतच बदलत असेल, तर भूतकाळातील नमुने भविष्याला किती लागू पडतील, हा प्रश्न राहतो.

चीनच्या या प्रयत्नांकडे केवळ हवामानशास्त्राrय प्रयोग म्हणून पाहणेही चुकीचे ठरेल. आज AI, सेमीकंडक्टर, उच्च क्षमतेची संगणकीय व्यवस्था, उपग्रह आणि डेटा या सर्व क्षेत्रांत अमेरिका, चीन आणि युरोपमध्ये तीव्र स्पर्धा सुरू आहे. गुगलचे ‘ग्राफकास्ट.’ युरोपियन केंद्राचे ‘एआयएफएस’ (AIFS) यांना चीन टक्कर देत आहे. हवामान अंदाजाच्या शर्यतीत मोठे भू-राजकीय आणि आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. हवामानविषयक माहितीचा उपयोग शेतीपुरता मर्यादित नाही. ऊर्जा उत्पादन, जलव्यवस्थापन, वाहतूक, विमा, शहरी नियोजन, आपत्ती व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांची आखणी यासाठी ती अत्यावश्यक आहे. ज्या देशाला काही दिवस आधी अचूकपणे कळू शकते की, कुठे मुसळधार पाऊस पडणार आहे, कुठे उष्णतेची लाट येणार आहे किंवा चक्रीवादळाचा मार्ग कोणता असू शकतो, त्या देशाला निर्णय घेण्यासाठी इतरांपेक्षा आघाडी मिळते. त्यामुळे भविष्यात हवामान डेटा ही रणनीतिक संपत्ती ठरू शकते. या सगळ्या तंत्रज्ञानाच्या चर्चेपलीकडे एक अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो. आपण हवामानाचा अंदाज अधिक अचूक करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करू, पण हवामान बदलाची मूळ कारणे कमी करण्यासाठी तेवढीच राजकीय इच्छाशक्ती दाखवू का?

चीनने हवामान आणि AI यांची सांगड घालून भविष्यातील तंत्रज्ञानाची दिशा दाखवली आहे. भारताने या स्पर्धेकडे केवळ चीनच्या प्रगतीकडे पाहण्याच्या दृष्टीने पाहू नये. ही स्वतची वैज्ञानिक क्षमता उभारण्याची संधी आहे. कारण उद्याच्या जगात ज्याच्याकडे अधिक अचूक हवामान अंदाज असेल, त्याच्याकडे केवळ चांगली माहिती नसेल, त्याच्याकडे शेती, पाणी, ऊर्जा, शहर आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत निर्णय घेण्यासाठी अधिक वेळ असेल आणि हवामान बदलाच्या युगात वेळ हीच सर्वात मौल्यवान संपत्ती आहे.
(लेखक पर्यावरण अभ्यासक आणि मुक्त पत्रकार आहेत)

भारताची अर्थव्यवस्था आणि सामाजिक रचना हवामानाशी घट्ट जोडलेली आहे. मान्सूनमधील बदल शेतीपासून सर्वच क्षेत्रांवर परिणाम करतो. अशा देशासाठी अचूक हवामान अंदाज ही चैनीची बाब नाही. भारतीय हवामान विभाग, IITM, NCMRWF, ISRO, INCOIS तसेच विविध विद्यापीठे आणि संशोधन संस्थांची मजबूत वैज्ञानिक पायाभूत व्यवस्था आहे. हवामान, समुद्र, उपग्रह, रडार आणि वातावरण यासंबंधी मोठ्या प्रमाणात डेटा उपलब्ध आहे. पण पुढचे पाऊल अधिक महत्त्वाचे आहे की, या डेटाचे AI मध्ये रूपांतर करण्याची राष्ट्रीय क्षमता निर्माण करणे. यासाठी केवळ काही प्रयोगशाळांमध्ये प्रकल्प राबवून भागणार नाही. उच्च क्षमतेची संगणकीय साधने, दर्जेदार आणि मुक्तपणे वापरता येणारा संशोधन डेटा, AI आणि हवामानशास्त्र यांचा संगम साधणारे तज्ञ आणि दीर्घकालीन सरकारी गुंतवणूक आवश्यक आहे. याहून महत्त्वाचे म्हणजे अंदाज लोकांच्या दारापर्यंत पोहोचला पाहिजे.