आज गर्दीचा रविवार, बाप्पाच्या दर्शनासाठी उसळणार झुंबड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेले सहा दिवस गजबलेल्या मुंबापुरीत रविवारी भक्तीचा जनसागर उसळणार आहे. घरगुती गौरी-गणपतींना भावपूर्ण निरोप दिल्यानंतर उसंत मिळालेले गणेशभक्त रविवारी सार्वजनिक गणपतींच्या दर्शनासाठी सहकुटुंब बाहेर पडतील. त्यामुळे ‘गणेशनगरी’ असलेल्या लालबाग-परळमध्ये 20 लाखांपेक्षा अधिक गर्दी उसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्राचा महाउत्सव राज्यभरात मोठय़ा उत्साहात सुरू आहे. शुक्रवारी पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले. शनिवारी गौरी-गणपतींना निरोप देण्यात आला. या दोन्ही विसर्जन मुहूर्तांना लागूनच हक्काची रविवारची सुट्टी आली आहे. त्यामुळे आता सार्वजनिक गणपतींकडे ओघ वाढणार आहे.

उपनगरात सर्वात प्रसिद्ध असलेल्या अंधेरीचा राजाने अयोध्येतील राममंदिर उभारले असून त्याच्या दर्शनासाठी भक्तांची अहोरात्र गर्दी उसळली आहे. तसेच चेंबूरच्या सह्याद्री क्रीडा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त साकारलेला सुपर हिरोंचा देखावाही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्याचप्रमाणे विलेपार्ले, घाटकोपर, भांडूप, विक्रोळी भागातही भव्य मूर्तींसह आकर्षक देखाव्यांनाही भक्तांची गर्दी पाहायला मिळणार आहे.

गिरगाव-खेतवाडीतही बाप्पाचा जयघोष

लालबाग-परळनंतर मुंबईतली सर्वात जुनी मंडळे असलेल्या गिरगावात गिरगावचा राजा, गिरगावचा महाराजासह उंच आणि आकर्षक मूर्तींचे माहेरघर असलेल्या खेतवाडीतील 13 ही गल्ल्या गणेशभक्तांनी ओसंडून वाहात आहेत. अनेक वर्षांनी इथल्या मंडळांनी गणेशभक्तांना आपल्याकडे खेचून आणल्याचे चित्र उभे राहिल्यामुळे हा भागही पुढील पाच दिवस गणेशमय होणार आहे.

पोलिसांची तारेवरची कसरत

लालबाग-परळमध्ये गणेश भक्तांची प्रचंड गर्दी उसळली असून गर्दीवर नियंत्रण  ठेवण्यासाठी तैनात पोलिसांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागतेय. लाखो भक्त एकाचवेळी लालबाग-परळमध्ये येत असल्याने तुलनेने पोलिस बळ मर्यादित आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण पडत असल्याचे दिसतेय.

गर्दीचे सर्व विक्रम मोडीत

मुंबई-राज्यातील गणेशभक्तांसह देशभराभरातूनही मोठय़ा संख्येने भाविक मुंबईत आल्यामुळे दक्षिण मुंबई अहोरात्र गजबजली आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसांत गर्दीचे सारेच विक्रम मोडले गेले आहेत. या भाविकांमुळे  यंदा सर्वच मंडळांच्या बाहेर हजारोंची गर्दी पाहायला मिळत आहे. परिणामतः गर्दीचा नवा विक्रम रचला गेला आहे. गेल्या सहा दिवसांत फक्त लालबागमध्येच 50 लाखांपेक्षा अधिक भाविक येऊन गेले असून उर्वरित पाच दिवसांत हा आकडा सवा कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

लालबाग-परळच पहिली पसंत

मुंबईच्या गणेशोत्सवात खरे आकर्षण आणि श्रद्धास्थान लालबागचा राजा असला तरी लालबाग-परळमधील गणेशगल्लीतला मुंबईचा राजा, राजा तेजुकायाचा, रंगारी बदक चाळीचा लाडका लंबोदर, काळाचौकीचा महागणपती, चिंचपोकळीचा चिंतामणी या साऱयाच गणेशोत्सव मंडळांनी भव्यदिव्य देखावे उभारले असल्यामुळे भक्तांची पावले यांच्याकडेही वळली आहेत. इतकेच नव्हे, परळ भागातील परळचा राजा, परळचा महाराजासह शिवडीचा राजा येथेही जनसागर उसळला आहे.