शिक्षणाचा बाजार! शिक्षक पात्रता परीक्षेच्या एका फुटलेल्या पेपरची किंमत 1 लाख रुपये! भिवंडी न्यायालयात साडेतीन हजार पानांचे आरोपपत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सध्या शिक्षणाचा अक्षरशः बाजार मांडला गेला आहे. शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) एका फुटलेल्या पेपरची किंमत तब्बल एक लाख रुपये असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवणाऱया टीईटी पेपरफुटी प्रकरणी भिवंडी न्यायालयात साडेतीन हजार पानांचे आरोपपत्र दाखल झाले असून त्यात अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा झाला आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याबाबतचा खटला फास्ट ट्रकवर चालवला जाणार आहे. त्यामुळे किमान तीन महिन्यांत त्याचा निकाल लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

देशात सर्वत्र पेपरफुटीचे सत्र सुरू असतानाच महाराष्ट्रात 26 जून रोजी टीईटीचा पेपर फुटला. भिवंडीत या प्रकरणातील आरोपींना अटक केली होती. आतापर्यंत 16 जणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. मथुरा येथील ज्या छापखान्यातून हा पेपर बाहेर काढला त्या गुह्यातील मुख्य आरोपी ब्रिजेश गुप्ता यालाही अटक केली आहे. भिवंडी न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.ए. कोरे यांच्या न्यायालयात जे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे त्यात पेपरफुटीची धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.

यांची नावे दोषारोपपत्रात

टीईटी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत बिजेंद्र कुमार गुप्ता, इंद्रजीत सिंह, राजीव शॉ, आकाश कुमार, धीरज सिंह, सोनू सिंह, मिथुन सिंह, कपिल दहिया, सुमनकुमारी गुप्ता, नरेशकुमार महोर, संजयकुमार शर्मा, बाबूलाल कुशवाह, सोनूकुमार दिवाकर आणि प्रकाश पवार यांच्या नावांचा समावेश दोषारोपपत्रात करण्यात आला आहे. 18 आरोपींपैकी दोन जण अद्याप फरार असल्याचेही त्यात नमूद केले आहे.

विद्यार्थ्यांची मार्कलिस्ट, शैक्षणिक कागदपत्रे ठेवली ओलीस

प्रश्नपत्रिका दिल्यानंतरही काही उमेदवार पैसे देण्यास टाळाटाळ करीत असत. त्यामुळे एक लाख रुपये किमतीला ज्यांनी प्रश्नपत्रिका विकत घेण्याची तयारी दर्शवली अशा विद्यार्थ्यांकडून पूर्ण पैसे मिळावेत यासाठी आरोपींनी नामी शक्कल लढवली होती. त्यांनी मुलांची मार्कलिस्ट व अन्य शैक्षणिक कागदपत्रे ‘सिक्युरिटी’ म्हणून स्वतःकडे ओलीस ठेवल्याची बाब तपासात समोर आली आहे. 26 उमेदवारांची शैक्षणिक कागदपत्रे आरोपी प्रकाश पवार याने दिल्लीतील अशोककुमार साओ याच्याकडे दिली होती.

टीईटीची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी 80 हजारांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंतचा भाव लावण्यात आला होता. पैसे आपल्याला मिळतील याची खात्री पटल्यानंतरच आरोपींनी प्रश्नपत्रिका विकली.

टीईटी पेपरफुटीमध्ये एकूण 18 आरोपी असून त्यापैकी आतापर्यंत 16 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याशिवाय आणखीही काही संशयास्पद व्यक्तींची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येते.

टीईटीची परीक्षा 28 जून रोजी घेण्यात येणार होती. मात्र त्यापूर्वीच दोन दिवस आधी 26 जूनला हा पेपर फुटला. भिवंडीतील कोनजवळ पोलिसांनी सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले.