
>> प्रा. समीर जाधव
[email protected]
तंजावरच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अंगाचा परिचय करून घेताना संप्रदायांचे महत्त्व लक्षात येते. दक्षिण भारतात प्रामुख्याने वैष्णव संप्रदायाचा प्रभाव असला तरी तंजावरमध्ये शैव, वैष्णव आणि नाथ संप्रदायाचाही प्रभाव दिसून येतो.
तंजावर स्थलमहात्म्य या सदरात आतापर्यंत तंजावरच्या राजकीय आणि कलात्मक प्रवासाचा आढावा घेतला. आजपासून आपण तंजावरच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अंगाचा परिचय करून घेणार आहोत. दक्षिण भारतात प्रामुख्याने वैष्णव संप्रदायाचा प्रभाव असला तरी तंजावरमध्ये शैव आणि वैष्णव या दोनही संप्रदायांचा प्रभाव राहिला होता. तंजावरमध्ये शैव-वैष्णवांचा समन्वय साधला गेला होता. ‘श्रीत्यागेश’ ही भोसलेराजांची कुलदेवता होती. त्यामुळेच विष्णू आणि शिवाचे ऐक्य तंजावरकरांनी स्वीकारले असावे. तंजावरच्या राजगोपालस्वामी मंदिरातील शिवेंद्राचे शिल्पही याची साक्ष देते. वैष्णव आणि शैव संप्रदायाशिवाय नाथ संप्रदायाचाही उल्लेख आढळतो. या संप्रदायातील कवी चिदंडशंकर हा तंजावरचा दरबार कवी होता. यावरून नाथ संप्रदायातील विद्वानांना राजाश्रय होता, असे म्हणता येते. परंतु भोसलेराजांच्या काळात तंजावरमध्ये महाराष्ट्रातील समर्थ संप्रदाय विशेष प्रभावीपणे कार्यरत होता असे दिसते.
तंजावरात मराठ्यांच्या काळात नऊ रामदासी मठ अस्तित्वात आले. त्यापैकी सात मठ तंजावरात आणि मन्नारगुडी व कोनूर येथे प्रत्येकी एक असे आहेत.1)आदिगुरू भीमराज गोसावी मठ 2) भीमराज स्वामी मठ 3) श्री स्वामी मठ 4) श्री भीमदास मठ 5) श्री गोविंदबालस्वामी मठ 6) झोळीरामबाबा मठ 7) अन्नाजीभव मठ 8) मन्नारगुडीचा अनंत मौनी मठ 9) कोनूरचा मठ. हे ते नऊ मठ होत. हे मठ ‘आज’ही तंजावरमध्ये धार्मिक कार्ये पार पाडत असल्याचे दिसते.कावेरी खोऱयातील समर्थ संप्रदायाचा विचार केला तर रामोपासनेची सुरुवात व मठस्थापनेची सुरुवातच सन 1676-77 च्या सुमारास झाली.
दक्षिण प्रांतात रामेश्वर यात्रेनिमित्त समर्थ सन 1677 मध्ये तंजावर जवळील मन्यारगुडी येथे आले होते. मन्यारगुडीला ‘दक्षिण द्वारका’ म्हणतात. राजगोपालविलासाचे भव्य मंदिर येथे आहे. व्यंकोजीराजांना समर्थ आल्याची बातमी लागताच तंजावरहून मन्यारगुडीला जाऊन त्यांनी समर्थांचे स्वागत केले व त्यांना तंजावरला घेऊन आले. व्यंकोजीराजांनी संत रामदासांना आपण येथेच राहावे अशी विनंती केली. त्यावर समर्थ म्हणाले, ‘आम्ही एका जागेत राहणे साध्य नाही. आमचे शिष्य भीकाजीबाबा उढर्फ भीमस्वामी शहापूरकर येथे राहून आपणांस कृतार्थ करतील आणि या तंजावर प्रांतात समर्थ संप्रदाय चालवतील.’ त्याप्रमाणे समर्थ तेथून पुढे रामेश्वर यात्रेस निघून गेले. भीमस्वामी शहापूरकरांशिवाय त्यांनी आपले अजून दोन शिष्य तंजावर भागात ठेवले. खुद्द तंजावरात भीमस्वामी शहापूरकर, आधी अरुणाचल व नंतर मन्यारगुडीस आलेले अनंतमौनी आणि त्यांचे शिष्य मेरूस्वामी, तर तंजावर जवळच असलेल्या कोनूर येथे राघवस्वामी व त्यांचे शिष्य माधवस्वामी. या तीन शिष्यांच्या
परंपरेतूनच पुढे तंजावर प्रदेशात समर्थ संप्रदाय वाढला.
समर्थांच्या देखतच भीमस्वामी शहापूरकर, अनंतमौनी व मेरूस्वामी आणि राघवस्वामी व माधवस्वामींचे घराणे यांनी रामदासी संप्रदायाची उभारणी केली आहे. या तिघांच्या परंपरेत मठमंदिर निर्मिती मोजकीच झाली असली तरी रामदासी साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात त्यांनी जी अजोड कामगिरी करून ठेवली आहे त्याला तोड नाही. श्री समर्थ शिष्य भीमस्वामी शहापूरकर यांनी तंजावर प्रांतात मठाधिपती म्हणून श्रीराम सेवेच्या कार्यात पारंगत होऊन श्रींचे संप्रदाय कार्य चालविले. वयाच्या 33व्या वर्षी (इ.स. 1676) तंजावरला आले. इ.स. 1681 श्री समर्थांच्या निवार्णानंतर एकूण 60 वर्षे श्रींची आराधना पुण्यतिथी (दास नवमी) महोत्सव साजरे केले आहेत. त्यांच्या वयाच्या 99व्या वर्षी म्हणजे इ.स. 1741साली त्यांचे निधन झाले. श्री भीमस्वामींचे नंतर त्यांना वंशज नसल्याने त्यांच्या मुलीचा मुलगा श्रीरामनाथ स्वामीस तंजावर मठाचा मठपती म्हणून जबाबदारी देऊन पुढे श्रींचे संप्रदाय कार्य करण्यास सिद्ध करण्यात आले. त्यावेळपासून श्री समर्थांनी मुक्काम केलेल्या स्थळी म्हणजे मठात श्रीरामनाथ स्वामीनंतर काही भक्तीसमुदायाच्या सहाय्याने श्रीभीमस्वामींचे शिष्य समुदायापैकी तिघांनी संप्रदाय परंपरा पुढे चालवली. त्यात 1) श्रीराम गोस्वामी यांनी समर्थांची झोळी प्रसाद म्हणून घेऊन आपली परंपरा चालविली आहे. सध्या या मठाचा विद्यमान मठपती म्हणून श्री जयराम गोस्वामी हे आपले सेवाकार्य करीत आहेत. 2) अन्नाजी उढर्फ आत्माराम गोस्वामी यांनी कुबडी प्रसाद म्हणून घेऊन आपली परंपरा चालविली आहे. सध्या या मठाचा विद्यमान मठपती म्हणून श्री त्यागराज उढर्फ गुरुदास गोस्वामी हे आपले सेवाकार्य करीत आहेत. 3) गोविंदबाळ स्वामी यांनी समर्थांच्या पादुका प्रसाद म्हणून घेऊन आपली परंपरा चालविली आहे. सध्या या मठाचा विद्यमान मठपती म्हणून श्री भावुस्वामी (नरसिंहपूरकर) गोस्वामी हे आपले सेवाकार्य करीत आहेत. हे तिन्ही मठ तंजावरच्या राजवाडा परिसरातच आहेत.
मराठा राजांनी समर्थ संप्रदायाला राजाश्रय दिला होता. इतकेच नव्हे तर अनंत मौनींचे शिष्य सेतुभव स्वामी हे राजा प्रतापसिंहांचे गुरू होते. समर्थ संप्रदायामुळेच तंजावरमध्ये रामदासनवमी आणि रामदास स्वामी, माधव स्वामी, अनंत मौनी भीमस्वामी यांच्या पुण्यतिथी साजऱया होत असत आणि या मठांमधून त्या आजही साजऱया होत आहेत.
(लेखक तंजावरची कला, संस्कृती, साहित्य याचे अभ्यासक आहेत.)





























































