देशाचे भविष्य घडवणाऱ्या तरुणांचे आपण खरोखर ऐकत आहोत का? आलिया भट्टचा उद्विग्न सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील काॅक्रोचच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता बॉलिवूडमधून वाढता पाठिंबा मिळत असून अभिनेत्री आलिया भट्टनेही अखेर या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईनंतर अनेक कलाकारांनी समर्थन दर्शविल्यानंतर आलियानेही सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम केला आहे.

 

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये आलिया भट्टने लिहिले, “गेल्या काही दिवसांपासुन माझे हृदय वारंवार तुटलेले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे एक स्वप्न, एका कुटुंबाची आशा आणि असंख्य त्याग दडलेले आहेत. ते केवळ स्वतःसाठी नाही, तर पुढील पिढ्यांसाठीही अधिक चांगले भविष्य घडवण्यासाठी उभे आहेत.”

 

View this post on Instagram

 

विद्यार्थ्यांच्या धैर्याचे कौतुक करत आलियाने पुढे म्हटले की, “देशाचे भविष्य घडवणाऱ्या तरुणांचे आपण खरोखर ऐकत आहोत का? भविष्य हे विद्यार्थ्यांचेच आहे.. जय हिंद.” तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी तिच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. यापूर्वी सलमान खाननेही आंदोलनाला पाठिंबा दर्शवित विद्यार्थ्यांवरील कारवाईबद्दल खेद व्यक्त केला होता. पेपरफुटीसारख्या गंभीर प्रश्नावर विद्यार्थी शांततेच्या मार्गाने लढत असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या धैर्याचे कौतुक केले. तसेच या आंदोलनाचे राजकीयकरण होऊ नये आणि त्याचे श्रेय विद्यार्थ्यांनाच मिळावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

दरम्यान, हुमा कुरेशी आणि साकिब सलीम यांनी जंतर-मंतर येथे आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाठिंबा दिला. याशिवाय राजकुमार राव, प्रकाश राज, नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी, जावेद अख्तर आणि अनुपम खेर यांसारख्या अनेक कलाकारांनीही आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी एकजूट व्यक्त केली आहे. त्यामुळे आंदोलनाला आता बॉलिवूडमधूनही व्यापक पाठिंबा मिळताना दिसत आहे.