
देशभरात सर्वच वस्तूंचे भाव वाढवून सर्वसामान्यांना महागाईचे झटके देणाऱ्या केंद्र सरकारने आता पासपोर्टच्या किंमतीतही वाढ केली आहे. केंद्र सरकारच्या नव्या धोरणामुळे आता पासपोर्ट काढण्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. पासपोर्ट बनवण्याच्या फीमध्ये वाढ करण्यात आली असून यासंबंधी एक परिपत्रक परराष्ट्र मंत्रालयाने जारी केले आहे.
15 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलासाठी 36 पानांचा पासपोर्ट बनवला असल्यास तो फक्त पाच वर्षे किंवा 18 वर्षांपर्यंत जे आधी येईल ते वैध राहील. याआधी एखादे मूल 15 वर्षे वयात पासपोर्ट बनवत असेल तर त्याचा पासपोर्ट बनवल्यापासून 5 वर्षे किंवा मुलाच्या 15 वर्षे होण्याच्या तारखेपर्यंत वैध असायचा. परंतु आता असे होणार नाही. जर 5 वर्षे उलटून गेली किंवा मूल 18 वर्षांचे झाले तर त्याला आता नवीन पासपोर्ट बनवावा लागेल. पासपोर्टच्या वैधतेसोबत पासपोर्ट फीमध्ये बदल करण्यात आले आहेत. हे बदल मुलांच्या पासपोर्टपासून प्रौढांच्या पासपोर्टपर्यंत लागू असतील.
नव्या नियमांनुसार, मुलाच्या 36 पानांच्या पासपोर्टसाठी 1750 रुपये द्यावे लागतील. याआधी यासाठी फक्त 1 हजार रुपये फी भरावी लागत होती. जर मुलासाठी 36 पानांचा तत्काळ पासपोर्ट बनवायचा असेल तर त्यासाठी 4 हजार 250 रुपये द्यावे लागतील. या पासपोर्टसाठी आधी केवळ 3 हजार रुपये फी लागत होती. याशिवाय, प्रौढ व्यक्तीच्या 36 पानांच्या पासपोर्टसाठी अडीच हजार फी करण्यात आली आहे. याआधी ही फी केवळ दीड हजार रुपये होती. तर प्रौढांच्या तत्काळ पासपोर्टसाठी 5 हजार रुपये फी आकारली जाणार आहे. याआधी ही फी केवळ 3 हजार 500 रुपये होती.
60 पानांसाठी जास्त फी
18 वर्षांवरील व्यक्तीच्या 60 पानांच्या पासपोर्टसाठी 3 हजार 500 रुपये फी द्यावी लागेल. याआधी 2 हजार रुपये फी होती. तर 60 पानांच्या तत्काळ पासपोर्टसाठी 6 हजार रुपये द्यावे लागतील. आधी 4 हजार रुपये फी होती. याशिवाय, डुप्लिकेट पासपोर्ट बनवण्याच्या फीमध्येही 5500 वरून थेट 7,500 रुपये फी करण्यात आली आहे. म्हणजेच तब्बल 3 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.




























































