
एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात घडली आहे. या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सर्वच आरोपींना म्हसळा पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
अल्पवयीन मुलीवर तिच्या एका सहकाऱ्याने ऑगस्ट २०२५ मध्ये अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिला धमकावून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांनी या मुलीला आपल्या वासनेचे शिकार बनवले. हा प्रकार गेल्या एक वर्षापासून सुरू होता. ही मुलगी हा त्रास सहन करत असतानाच तिच्या घराचे काम करणाऱ्या मिस्त्रीनेही तिच्यावर अत्याचार केला. या मिस्त्रीने तिला बदनामी करण्याची धमकी देऊन तीन महिने तिचे लैंगिक शोषण केले. हा प्रकार असह्य झाल्यानंतर या मुलीने पोलिसांत धाव घेतली आणि हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून पाचही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यापैकी दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्याचे अधिकारी राजेंद्र जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
महिन्यात दुसरी घटना
म्हसळा तालुक्यामध्ये यापूर्वी २३ ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ही घटना घडून महिनाही उलटत नाही तोच १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे
































































