
उरण परिसरात ग्रामीण व शहरी भागात साधारणतः १३१ नोंदणीकृत डॉक्टर कार्यरत आहेत. मात्र परिसरात अडीचशेहून अधिक डॉक्टरांनी गल्लोगल्ली दवाखाने थाटले आहेत. यामध्ये विनापरवाना व कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांची संख्या अधिक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वैद्यकीय विभागाच्या दुर्लक्षामुळे उरणमध्ये मुन्नाभाईंचा सुळसुळाट झाला आहे.
उरण परिसरात औद्योगिकीकरणामुळे लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वाढती लोकसंख्या व बाहेरुन येणाऱ्या कामगारांमुळे शहर व गावोगाव वास्तव्यास येणाऱ्या भाडेकरूंच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अपघात, रोगराईचे प्रमाणही वाढले आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालयांची संख्या अगदी नगण्य आहे. याचाच फायदा घेऊन उरण परिसरातील ग्रामीण भागात अनेक डॉक्टरांनी गल्लोगल्ली दवाखाने थाटले आहेत. यामध्ये विनापरवाना व कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांची संख्याही मोठी आहे.
तक्रार करण्याचे आवाहन
उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांची वैद्यद्यकीय पदवी आणि परवाना आवर्जून तपासावा. डॉक्टरची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये असल्याची खात्री करुन संशयित डॉक्टरांची तक्रार करा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
- उरण परिसरातील ग्रामीण भागात सध्याच्या परिस्थितीत एमबीबीएस, बीएमएमएस, बीयूएमएस असे ७७ नोंदणीकृत डॉक्टर कार्यरत असल्याची माहिती उरण तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
- शहरात अधिकृत १४ इस्पितळांची अधिकृतपणे नोंदणी करण्यात आली आहे. या १४ इस्पितळांमध्ये सुमारे ५४ डॉक्टर कार्यरत आहेत, अशी माहिती उरण यांनी दिली. येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक बाबासो काळेल
































































