
पंजाबमध्ये भाजपने नशामुक्त रथयात्रा सुरू करण्याचे ठरवले आहे, परंतु त्याआधीच भाजप नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री रवनीत बिट्टू यांच्या ताफ्यावर टोमॅटो आणि अंड्यांचा मारा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू रवनीत बिट्टू यांना झेड प्लस सुरक्षा मिळालेली आहे. तरीही त्यांच्या ताफ्यावर अंडी फेकण्यात आली. पंजाबमधील सर्व 117 जागांचा समावेश असलेली भाजपची 4 हजार किमी लांबीची नशामुक्ती यात्रा शुक्रवारपासून पठाणकोट येथून सुरू झाली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. भाजपची 13 दिवसांची ही यात्रा 30 सप्टेंबर रोजी जालंधर येथे संपणार आहे. ज्या जमावाकडून त्यांच्या ताफ्यावर टोमॅटो आणि अंडी फेकण्यात आली, ती आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा गंभीर आरोप रवनीत बिट्टू यांनी केला आहे. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना तातडीने एका घरात नेले. रवनीत बिट्टू यांच्या ताफ्यावर अंडी फेकणारे महामार्गाच्या कडेला उभे होते. बिट्टू यांचा ताफा येताच त्यांनी टोमॅटो आणि अंड्यांचा मारा केला.


























































