
ऑफिसच्या परवानगीशिवाय व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केल्याने नोकरीचा राजीनामा घेता येणार नाही, असा निर्वाळा देत टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सच्या (टिस) एका प्रोफेसरला उच्च न्यायालयाने दिलासा आहे. या प्रोफेसरला सक्तीची निवृत्ती घेण्याचे दिलेले आदेश न्यायालयाने रद्द केले.
या प्रोफेसरने टिसच्या माजी विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार केला. हा ग्रुप तयार करताना प्रोफेसरने ऑफिसची परवानगी घेतली नाही, असा ठपका ठेवत सक्तीची निवृत्तीची घेण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईविरोधात प्रोफेसरने न्यायालयाचे दार ठोठावले.
न्या. मकरंद कर्णिक व न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. व्हॉटस्अॅप ग्रुपद्वारे नोकरीची संधी दिली जात होती. यासाठी पैसे घेतले जात होते. या आरोपांत तथ्य नाही. या ग्रुपवर केवळ नोकरीच्या उपलब्ध संधीची माहिती दिली जात होती.
शिक्षा अवास्तव
या व्हॉटस्अॅप ग्रुपवर टिसचा लोगो लावताना व हा ग्रुप तयार करताना प्रोफेसरने ऑफिसची परवानगी घेतली नव्हती हे सत्य आहे. पण त्यासाठी नोकरीचा राजीनामा घेणे ही शिक्षा अवास्तव आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
हातोडय़ाने शेंगदाणा तोडताय
व्हॉटसग्रुप तयार करण्याची दिलेली शिक्षा हा हातोडय़ाने शेंगदाणा तोडण्याचाच प्रकार आहे. हा प्रोफेसर एक उत्तम शिक्षक आहे. असे असताना त्याचा राजीनामा घेणे मान्य होऊ शकत नाही, असेही खंडपीठाने नमूद केले.


























































