
मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाची आर्थिक घडी कंत्राटीकरणामुळे कोलमडली आहे. बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसगाडय़ांची घटती संख्या, कंत्राटी बसगाडय़ांवरील वाढते अवलंबित्व, अपुरे मनुष्यबळ आणि कंत्राटीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे बेस्टची आर्थिक स्वायत्तता अधिकच कमकुवत होत असल्याचा दावा ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’ या संस्थेने केला आहे. याच पार्श्वभूमीवर बेस्टचे सार्वजनिक स्वरूप कायम ठेवून तिचे आर्थिक आणि प्रशासकीय पुनरुत्थान करण्यासाठी सरकार, प्रशासन व मुंबईकरांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.
बेस्टची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याऐवजी ती हळूहळू कंत्राटी पद्धतीवर अवलंबून ठेवली जात असल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष रूपेश शेलटकर यांनी केला आहे. इलेक्ट्रिक बसगाडय़ा घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचेही म्हणणे संस्थेने मांडले आहे. बेस्टच्या एकूण वाहन संख्येत इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण केवळ 0.03 टक्क्यांच्या आसपास असताना मुंबईतील प्रदूषणासाठी बेस्टच्या गाडय़ांना टार्गेट का केले जाते, असा सवाल संस्थेने केला आहे.

























































