खर्डीत मोकाट गुरांचा रास्ता रोको; अपघाताचा धोका, विद्यार्थ्यांमध्ये दहशत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खर्डी गावात मोकाट जनावरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गावाच्या मुख्य रस्त्यावर बैल, गाई, म्हशींचे कळपच्या कळप अक्षरशः ठाण मांडून बसलेले असतात तसेच अनेक जनावरे नागरिकांना टार्गेट करत असल्याने एखादा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या गुरांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहे. खर्डी ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्ते, बाजारपेठ, गावातील अंतर्गत रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे फिरत आहेत. या जनावरांमुळे नागरिक, दुचाकीस्वार व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. खर्डी नाक्यावरील उड्डाण पुलाखाली मोकाट गुरे घोळक्याने उभी राहत असल्याने वाहतुकीस देखील अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधीदेखील जनावरांच्या हल्यात अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ही जनावरे शेतीचे नुकसान करत असल्याने सर्वसामान्य खर्डीकरांची डोकेदुखी वाढली असल्याने शिवसेनेचे शाखाप्रमुख भास्कर बेनके यांनी जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली आहे.