
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक शाळांच्या इमारती जीर्ण आणि नादुरूस्त झालेल्या असून सद्यस्थितीमध्ये त्या दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. त्याचवेळी गेल्या काही वर्षामध्ये शाळांच्या इमारती कोसळण्याच्या राज्यामध्ये दुर्घटना घडल्या आहेत. अशा स्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शाळांचे ‘सेफ्टी ऑडिट’ (सुरक्षा मूल्यांकन) तातडीने करण्याच्या सूचना राज्याच्या शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत. या आदेशाला सुमारे दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी, अद्यापही शाळांच्या ‘सेफ्टी ऑडीट’ करण्याला स्थानिक प्रशासनाला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या शाळांच्या सेफ्टी ऑडीटसाठी शिक्षण विभाग मुहूर्त कधी साधणार? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून छप्पर नादुरूस्त अन् धोकादायक झालेल्या तालुक्यातील शाळांचे नुकतेच सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यामध्ये तालुक्यातील ११७ शाळांच्या इमारतींचे छप्पर नादुरूस्त झालेले असून त्याची तातडीने दुरूस्ती होणे गरजेचे असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यापैकी ७० शाळांच्या इमारती धोकादायक झालेल्या असून त्यांच्या संपूर्ण छप्पर दुरूस्तीसह ४७ शाळांच्या इमारती तत्काळ दुरूस्त होणे गरजेचे आहे. या शाळांची छप्पर दुरूस्ती अन् नवीन वर्गखोल्या उभारणीसाठी तब्बल सुमारे ५ कोटी ९ लाख रूपयांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजस्थानमधील झालावाड येथे एका शाळेची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने शाळांचे सुरक्षा मूल्यांकन करण्याची सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व शाळांचे तातडीने सुरक्षा मूल्यांकन करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सेफ्टी ऑडीटचा अहवाल बंधनकारक असून प्रत्येक शाळेला सुरक्षाविषयक मूल्यांकन करून त्याचा कृती अहवाल’ तयार करावा लागणार आहे. हा अहवाल शाळा, तालुका आणि व्यवस्थापननिहाय विभागीय शिक्षण उपसंचालकांमार्फत थेट शिक्षण संचालनालयाकडे सादर करण्याच्या सूचनाही आहेत. सुरक्षेत त्रुटी आढळल्यास त्यांची तातडीने दुरुस्ती करून स्वतंत्र अनुपालन अहवाल सादर करावा लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांच्या इमारतींचे बांधकाम तीन-तीन दशकांपूर्वी केलेले आहे. त्यांची सातत्याने किरकोळ डागडूजी व्यतिरीक्त अन्य फारशी कामे झालेली नाही. अनेक शाळांच्या भितींच्या रंगरंगोटी झालेल्या असल्याने या इमारती सुशोभित दिसत असल्या तरी, त्यांची छप्पर नादुरूस्त अन् धोकादायक झालेली आहेत. अनेक शाळांच्या छप्पराच्या लाकडी रिपा तुटण्याच्या स्थितीमध्ये आहेत. गत महिन्यामध्ये कोंड्ये येथील शाळेमध्ये छप्पराची लाकडी रिप तुटून खाली कोसळल्याची घटना घटली होती. सुदैवाने, त्यावेळी कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या निर्देशाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वाचे असलेले शाळांचे सेफ्टी ऑडीट होणे गरजेचे आहे. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी, अद्यापही शाळांच्या सेफ्टी ऑडीटला स्थानिक शिक्षण विभागाला मुहूर्त मिळालेला नाही.
































































