
पावसाने ओढ दिल्याने विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर दुष्काळाची स्थिती आहे. शेतकरी हवालदिल झाला असून मदतीची याचना करत आहे. एकीकडे शेतकरी विवंचनेत असताना दुसरीकडे दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नांदेडमध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीत नेते आणि अधिकाऱ्यांनी काजू-बदामवर ताव मारला. या बैठकीतील व्हीडिओ आणि फोटोही समोर आलेत. यावरून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे तर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. पण बैठकीनंतर काजू-बदामावर पत्रकारांनी विचारलेला प्रश्न शिंदे गटाच्या खासदाराला झोंबला आणि ते पत्रकारांवरच भडकले.
“दुष्काळ आहे म्हणून कोणी खात नाही का?”
तुमच्यासमोर कोणी काही ठेवलं तर तुम्ही खाणार नाही का? दुष्काळजन्य परिस्थिती आहे तर सगळ्याच गोष्टी बघा मग. कोणाला भूक लागली असेन म्हणून खाल्ले असतील, त्यात एवढी मोठी गोष्ट काय? दुष्काळ आहे म्हणून कोणी खात नाही का? जिल्हाधिकाऱ्यांना विचारा ना की येथे काजू-बदाम का ठेवलेत? त्या काजू-बदामची किंमत किती असू शकते, फार-फार तर ५०, १०० रुपये. एवढ्यासाठी तुम्ही राईचा थेट पर्वत करण्याची काय गरज? तुमच्या मीडियाने उचललेला हा फा… धंदा आहे. तुम्ही ज्या गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे, त्याकडे लक्ष केंद्रीत करा. शेतकरी दुष्काळात परेशान आहे, त्यावर तुम्ही बोला. काजू-बदाम खाण्याच्या विषयावर तुम्ही बोलू नका, असे म्हणत शिंदे गटाचे खासदार संजय जाधव पत्रकारांवरच चिडले.




























































